Wednesday, October 9, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकमधील संत कबीर नगर झोपडपट्टीला भीषण आग

नाशिकमधील संत कबीर नगर झोपडपट्टीला भीषण आग

सिलिंडर स्फोटामुळे दुसऱ्या दिवशीही आगीची घटना

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील द्वारका परिसरात असलेल्या झोपडपट्टीला सिलिंडर स्फोटामुळे मोठी आग लागली आहे. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान नाशिक जिल्ह्यात सिलिंडर स्फोट झाल्याची ही लागोपाठ दुसऱ्या दिवसातील दुसरी घटना आहे

नाशिक शहरातील द्वारका परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग लागली असल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या वतीने देण्यात आली. अग्निशमन दलाचे अकरा बंब घटनास्थळी दाखल झाले होते. आग विझवण्याचे काम सुरू होते. त्याचबरोबर आगीची घटना समजल्यानंतर बघ्यांची गर्दी झाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी, संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास द्वारका परिसरातील संत कबीरनगर येथे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तसेच या आगीत आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले. तसेच झोपडपट्टी भरगच्च असल्यामुळे सलग अर्ध्या तासापासून अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू असून आतमध्ये जाण्यास अडचण येत असल्यामुळे आग पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. त्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने वेगवेगळ्या स्तरावरती उपाययोजना करून आग आटोक्यात आणली आहे.

नाशिक शहराच्या गावठाण परिसरामध्ये असलेल्या या झोपडपट्टीमध्ये शेकडो नागरिकांची घर आहेत. या ठिकाणी मोलमजुरी करून राहणाऱ्या नागरिकांची संख्याही अधिक आहे. कारण ही झोपडपट्टी शहराच्या मध्यवस्ती असलेल्या द्वारका परिसरामध्ये आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलांबरोबरच पोलीस आणि समाजसेवी संस्थांकडून मदतीचे काम सुरू करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री जिल्ह्यातील सिन्नर येथे सिलिंडर स्फोटामुळे लागलेल्या आगीत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर शनिवारी लागोपाठ दुसऱ्या दिवशी नाशिक शहरात आग लागल्याची घटना घडली आहे.

हे सिलिंडर की आगीचे साहित्य?

नाशिक जिल्ह्यामध्ये सातत्याने सिलिंडर स्फोटामुळे आग लागल्याच्या घटना वाढत असून सरासरी सहा महिन्यांमध्ये म्हणजेच जानेवारी ते जून या कालावधीत जिल्ह्यात १२ पेक्षा अधिक घटना घडल्या आहेत. म्हणजे सरासरी महिन्याला दोन याप्रमाणे घटना घडत आहेत. या विषयावर जिल्हा प्रशासन आणि गॅस कंपन्या कोणतीही पावले उचलण्यास किंवा कोणतेही भाष्य करण्यास तयार नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भितीचे वातावरण आहे. जिल्ह्यात विकल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरच्या गुणवत्तेवरदेखील प्रश्नचिन्ह उभे राहिले असून हे सिलिंडर आहे की आग लावण्याचे साहित्य? असाच प्रश्न आता नागरिकांमध्ये विचारला जात आहे. मातंगवाडा येथे लागलेल्या आगीबाबत आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून पंचनाम्याचे आदेश शासनाकडून मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, असे त्या म्हणाल्या.

आमदार फरांदे यांनी घेतली दखल

द्वारका येथील मातंगवाडा परिसरात सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी संभाजीनगर येथे असणाऱ्या आमदार देवयानी फरांदे यांना आगीची बातमी समजताच त्यांनी तत्काळ दखल घेऊन महानगरपालिका पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी नितीन नेर यांना अग्निशामक दलाचे वाहने पाठविण्याचे आदेश दिले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांना या घटनेची कल्पना देऊन आवश्यक वैद्यकीय सुविधा तयार ठेवण्याचे आदेश दिले. आगीच्या घटनेत अनेक झोपड्यांचे नुकसान झाले असून शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सदर ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश आमदार देवयानी फरांदे यांनी तहसीलदार अनिल दौंडे यांना दिले. अधिक नुकसान झालेल्या परिवारांना शासनाकडून जास्तीत-जास्त मदत मिळवून देणार असल्याचे देवयानी फरांदे यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -