विरार (प्रतिनिधी) : विरार जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसाळ यांनी वसई व पालघर जिल्ह्यातील धोकादायक पर्यटनस्थळांवर यंदा पर्यटनबंदीचे आदेश पारित केले आहेत. सदर आदेशाचे पालन करणे महापालिका तसेच पोलीस प्रशासनाचे कर्तव्य असताना, वसईत मात्र पर्यटनबंदीचे तिनतेरा वाजले असल्याचे चित्र दिसून येते. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वसई पूर्वेतील तुंगारेश्वर धबधब्यात बुडून एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
वसईतील तुंगारेश्वर व चिंचोटी धबधबा हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहेत. दरवर्षी पर्यटक याठिकाणी झुंडीने पिकनिकला येत असतात. विकेण्ड म्हटला की याठिकाणी पर्यटकांचा मळाच फुलतो. कोरोना काळात आपत्ती व्यवस्थापन कायदा, संचारबंदी, पर्यटनबंदी असतानादेखील पर्यटक या दोन धबधब्यांवर पिकनिकसाठी येतात. आता कोरोना निर्बंध हटल्यानंतर पुन्हा सदर दोन्ही धबधब्यांवर पर्यटक यायला सुरूवात झाली आहे.
सध्या वसईत पर्यटनाला बंदी असताना पोलीस व महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेकडो पर्यटक याठिकाणी पिकनिकसाठी येत आहेत. सदरचे दोन्ही धबधबे हे पर्यटनासाठी धोकादायक असल्याचे याठिकाणी पर्यटकांच्या जीवावर बेतलेल्या घटनांवरून दिसून येते. आता पर्यटनबंदीत एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याने पर्यटनबंदीवर ताशेरे ओढवले जात आहेत. तुंगारेश्वर धबधबा हा खोल आहे. याठिकाणी अंघोळ करताना पर्यटकांचा पाय घसरून खोल कपारित दगडावर डोके आपटून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पोलिसांचे होणारे दुर्लक्षच पर्यटकांच्या जीवावर बेतत आहे.