विरार (प्रतिनिधी) : विरार-पश्चिम रेल्वेवरील विरार ते बोरिवली दरम्यान दिवसेंदिवस वाढणाऱ्या गर्दीला आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या विरार ते बोरिवली दरम्यान ५ आणि ६ या नव्या मार्गिकाच्या सर्वेचे काम सुरु झाले आहे. यामध्ये वसईतील जुनी शाळा असलेल्या जि. जे. वर्तक सहलचा काही भाग जाणार असून त्याचबरोबर जवळपास १४ गृहनिर्माण सोसायट्यांनाही फटका बसणार असल्याचे समोर आले आहे.
पश्चिम रेल्वेच्या बोरिवली- विरार दरम्यान ५ आणि ६ वी मार्गिका टाकण्यात येणार आहेत. या मार्गिकेसाठीचा सर्वे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन तर्फे निशा इंजिनीअरिंग कंपनी करत आहे. निशा इंजिनीअरिंगने या बाबतचा सर्वे करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये जि. ज. वर्तक शाळेसह जवळपास १४ सोसायट्यांना याचा फटका बसणार आहे. रेल्वेला लागून असलेल्या जि. जे. वर्तक शाळेची काही जागा या रेल्वे लाइनमध्ये जाणार आहे. त्याचबरोबर शिवशक्ती अपार्टमेंट, सहयोग, आदर्श, जय यश कृपा, वीरा अपार्टमेंट, सोहन, रामधनी, चंपा सदन, श्रीराम कॉम्प्लेक्स, भगत स्नॅक, गुरुकृपा, जय निवास, मसूर मंजिल, हरिद्वार हॉऊस यांचा समावेश आहे.
सुरुवातीला हा सर्वे सुरु असल्याने या रेल्वे लाइनमध्ये किती जण बाधित होतात; त्यांना रेल्वे काय मोबदला देणार, याबाबत कोणतीही माहिती अजूनही मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाने जाहीर केली नसल्याने येथील नागरिकांमध्ये मात्र खळबळ उडाली आहे. याबाबत मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, हा प्राथमिक सर्वे असून तो पूर्ण झाल्यानंतर यात किती कुटुंब बाधित होतात हे समजेल. सर्वे पूर्ण झाल्यावर मोबदला आणि इतर फायद्याबाबत जाहीर केले जाणार आहे.
आमच्या जि.जे . वर्तक शाळेचा काही भाग ५ आणि ६ या नव्या रेल्वे लाइन खाली जाणार आहे. याबाबत शाळेच्या येथील जागेचा सर्वे करण्यात आला आहे; परंतु याबाबत काय मोबदला मिळणार हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही. – अॅड. जितेंद्र वनमाळी, ट्रस्टी जि. जे. वर्तक शाळा, वसई रोड
गेली कित्येक वर्षे आम्ही येथे राहत आहोत. अचानक आता नव्या रेल्वे मार्गिकेचा सर्वे सुरू करण्यात आला आहे. या रेल्वे मार्गिकेमुळे बाधित होणाऱ्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना याचा मोबदला काय देणार याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे सोसायटीमधील नागरिक घाबरले आहेत. रेल्वे प्रशासनाने याबाबत तातडीने येथील नागरिकांना माहिती द्यावी. – सोनल मनीष ठाकूर, चेअरमन, शिवशक्ती अपार्टमेंट