बर्मिंगहॅम (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल स्पर्धेत शुक्रवारचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला. पुरुष हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या सुधीरने सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रकुल स्पर्धेच्या पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा सुधीर हा पहिला भारतीय खेळाडू आहे. सुधीरच्या या कामगिरीमुळे भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या सहा झाली आहे.
पुरूष हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीरने एकतर्फी कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्याने पहिल्या प्रयत्नात २०८ किलो ग्राम वजन उचलले. दुसऱ्या प्रयत्नात त्याने २१२ किलो वजन उचलले. सुधीरचे वजन ८७.३० किलो आहे. ज्यामुळे त्याला १३४.५ गुण मिळाले.
यापूर्वी भारताला राष्ट्रकुल स्पर्धेच्या पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावता आले नव्हते. सुधीरने ही कोंडी फोडत भारताला ऐतिहासिक असे सुवर्णपदक जिंकून दिले आहे. त्यामुळे सुधीरवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नायजेरियाच्या इकेचूकवू क्रिस्टियन उबिचुकवुने १३३.६ गुण मिळवत रौप्य पदक जिंकले. तर स्कॉटलंडच्या मिकी युलेने १३०.९ गुणांसह कांस्य पदकावर आपले नाव कोरले. इकेचूकवू क्रिस्टियन उबिचुकवुने १९७ किलो आणि युलेने १९२ किलो वजन उचलले. त्यांच्या तुलनेत भारताचा सुधीर खूपच पुढे होता. सुधीरने २१२ किलो असे विक्रमी वजन उचलत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.