बोईसर (वार्ताहर) : पालघर जिल्ह्याचा ग्रामीण व शहरी भाग सध्या तापाने फणफणत आहे. गेल्या दोन महिन्यांत ताप, सर्दी, खोकला अशा साथरोगाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. उप जिल्हा, ग्रामीण रुग्णालये यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी दवाखान्यात बाह्यरुग्ण तपासणीच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे.
अचानक झालेल्या हवामान बदल यासह तापमान बदलामुळे साथरोग झपाट्याने वाढू लागल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जून महिन्यात सुमारे पन्नास हजार बाह्यरुग्ण तपासणीमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक रुग्ण हे साथरोगाचे आहेत. जूनच्या तुलनेत जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अखत्यारीत असलेल्या विविध शासकीय आरोग्य संस्थांमध्ये बाह्यरुग्ण तपासणीमध्ये कमालीची वाढ झाली. सुमारे ७० हजाराहून अधिक रुग्णांनी तपासणी केली असता, त्यात बहुतांश रुग्ण हे सर्दी, खोकला, ताप, पडसे आदी साथरोगाचे आहेत. साथरोगासाठी जिल्ह्यात आवश्यक व पुरेल इतका औषधसाठा उपलब्ध असल्याचे आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे.
तापमान व हवामान बदलाचा हा परिणाम असल्याने यादरम्यान संसर्गातून साथरोग होतो. मात्र त्यामुळे भीतीचे कोणतेही कारण नसल्याचेही आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे. साथरोग हा सामान्य प्रकारचा व लवकर बरा होणारा आजार आहे. साथरोग असलेले रुग्ण यांची सरासरी रक्त तपासणी व त्यातून निदान केले जाते. त्यातून काही वेगळा ताप किंवा विषाणूजन्य, डासजन्य आजाराचे निदान झाले तर त्या बाबतचे गांभीर्य ओळखून रुग्णांचा परिसर याची देखरेख केली जाते. संशयित नागरिकांची तपासणी करून उपाययोजना आखून आजाराला आळा घालण्याचे काम आरोग्य विभाग करते.
पालघर जिल्ह्यातील पाणी साठवणूक होणाऱ्या ग्रामीण व सागरी किनारपट्टी भागांमध्ये तसेच शहराच्या काही ठराविक भागांमध्ये डासजन्य आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही वाढ पूर्वीपेक्षा कमी असली तरी डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू, चिकनगुनिया अशा तापजन्य गंभीर आजारांबरोबर लेप्टोस्पायरोसिस सारखे रुग्णही पावसाळ्या दरम्यान आढळून येत आहेत. मलेरिया या रोगाचे आजाराचे रुग्णसंख्या कमी असली तरी डासांच्या फैलावामुळे तो वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. अलीकडेच तलासरी तालुक्यात आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांसह ते वावर करत असलेल्या इतर परिसरातही स्वाइन फ्लूचे जवळपास ३० रुग्ण आढळून आले होते. विद्यार्थ्यांना तो झाल्याने भीती वर्तवली गेली होती. मात्र योग्य उपचारामुळे ते वेळीच बरे झाले.
सध्या जिल्ह्याला करोनाची भीती नसली तरी साथजन्य आजारांबरोबर इतर गंभीर तापजन्य आजार पुढे आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून आरोग्य विभाग सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहे. तसेच वारंवार तपासण्या करणे, कोरडा दिवस पाळणे, औषधोपचार नियमित देणे, जोखमीच्या व्यक्तींना देखरेखी खाली ठेवणे यासह इतर उपाययोजना आरोग्य विभागामार्फत सुरू आहेत. नागरिकांनीही स्वतःची नैतिक जबाबदारी म्हणून काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
सध्या साथरोग रुग्ण वाढत असले तरी सामान्य उपचारामुळे ते बरे होत आहेत. त्यात भीतीचे कारण नाही. डासजन्य आजारांसाठी आरोग्य विभाग योग्य त्या उपाययोजना करत आहे.दनागरिकांची तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांचीही तितकीच जबाबदारी आहे. त्यांनीही खबरदारी घेणे आवश्यक आहे. -डॉ.सागर पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी, पालघर
डेंग्यूचा रुग्णांचा तक्ता (२०२२)
महिना – रक्त तपासणी – पॉझिटिव्ह रुग्ण
जानेवारी – २३ – ३
फेब्रुवारी – ५१ – ८
मार्च – ११९ – ९
एप्रिल – ११३ – ५
मे – ११६ – ९
जून – ९८ – १४
जुलै – १३१ – ९
एकूण – ६५१ – ५७