Thursday, October 10, 2024
Homeदेशभारतात लोकशाहीची हत्या; राहुल गांधींचा घणाघात

भारतात लोकशाहीची हत्या; राहुल गांधींचा घणाघात

देशातील काँग्रेसने ७० वर्षांत जे कमावले ते भाजपाने ८ वर्षात संपवले

नवी दिल्ली : भारतात लोकशाहीची हत्या सुरु आहे. देशातील काँग्रेसने मागील सत्तर वर्षांत जे कमावले ते भाजपाने आठ वर्षात संपवले आहे, असा घणाघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे. सध्या केंद्र सरकारवर टीका करण्याचे स्वातंत्र्य राहिलेले नाही. लोकशाहीची सुरु असलेली हत्या जनता पाहत आहे. सरकार विरोधात बोलल्यानंतर कारवाई सुरु आहे हे लोकशाहीला घातक आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.

यावेळी बोलताना गांधी यांनी केंद्रावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, संयुक्त राष्ट्रांना खोटं ठरवण्यापर्यंत केंद्र सरकारची मजल गेली आहे. देशात दिवसेंदिवस महागाईचे आकडे वाढत आहेत. वाढते महागाईचे आकडे अर्थमंत्र्यांना दिसत नाहीत का?, असा सवालही त्यांनी यावेळी केली आहे. कोरोना काळातील मृत्यूची आकडेवारी केंद्राकडून लपवली का जाते? स्टार्टअप इंडिया कुठे आहे? असेही काही सवाल त्यांनी मोदी सरकारला केले आहेत.

पुढे ते म्हणाले, मी सत्य बाहेर आणतो म्हणून माझ्यावर कारवाई करतात, मात्र मी बोलत राहणार असंही राहूल गांधींनी खडसावून सांगितल आहे. माझी भूमिका आक्रमक आहे. या भूमिकेद्वारे मी देशातील जनतेच्या प्रश्नांना तोंड फोडण्याच काम करणार आहे. सध्या भारतीय नागरिक महागाई, बरोजगारी यांबद्दल लढणार आहे. या विरोधात बोलल्यानंतर माझ्यावर पलटवार होणार आहेत, मात्र तरीही बोलत राहणार असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

देशात चार लोकांची हुकुमशाही

देशामध्ये चार लोकांची हुकुमशाही सुरु आहे. सध्या देशातील परिस्थिती भयानक आहे. आम्हाला फक्त अटक केले जात आहे. काँग्रेसने जे ७० वर्षात कमावले ते भाजपने ८ वर्षात गमावले आहे, अशी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे.

काँग्रेसने आज महागाई आणि बेरोजगारीविरोधात देशव्यापी आंदोलन छेडले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. या मुद्द्यावरुन संसदेत सरकारला घेरण्याचाही काँग्रेसने प्रयत्न केला.

ईडी आणि सीबीआय विरोधकांच्या मागे लावली जाते

राहुल गांधी पुढे म्हणाले की, आम्ही एका राजकीय पक्षाशी लढत नाहीत तर आम्ही संपूर्ण पायाभूत सुविधांशी लढत आहोत. राहुल गांधी म्हणाले की, जर कुणी विरोधकांना पाठिंबा देत असेल तर त्याच्या मागे ईडी आणि सीबीआय लावले जाते. त्यामुळे विरोधकांचा प्रभाव दिसत नाही. महागाईबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, अर्थमंत्र्यांना महागाई का दिसत नाही हेच कळत नाही. ते म्हणतात स्टार्टअप इंडिया आहे, सांगा कुठे आहे स्टार्टअप इंडिया. लोकांना नोकरीवरुन काढलं जात आहे. सरकारचं म्हणणं आहे की, कोरोनामध्ये एकही मृत्यू झाला नाही. ५ दशलक्ष लोक मरण पावले असे संयुक्त राष्ट्र म्हणत आहे, परंतु सरकार म्हणत आहेत की हे सर्व खोटे आहे. बेरोजगारीबाबत सरकार म्हणते की यात तथ्य नाही, असेही ते म्हणाले.

भारताच्या आजच्या परिस्थितीची भीती वाटते

ईडीच्या कारवाईबाबत राहुल गांधी म्हणाले की, जेवढं मी बोलेन, तेवढी माझ्यावर कारवाई केली जाईल. पण मी घाबरत नाही. आता माझ्यावर आणखी हल्ले होतील. जो धमकावतो तो घाबरत असतो. या लोकांना भारताच्या आजच्या परिस्थितीची भीती वाटते. त्यांनी दिलेल्या आश्वासनांची त्यांना भीती वाटते. लोकांच्या ताकतीला घाबरतात. महागाई आणि बेरोजगारीची भीती या लोकांना आहे. हे लोक २४ तास खोटे बोलण्याचे काम करतात, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

भारतात लोकशाही संपली

राहुल गांधी म्हणाले की, केवळ काँग्रेसच नाही तर देशातील कोणताही अभिनेता किंवा कोणीही व्यक्ती सरकारच्या विरोधात बोलला तर त्याच्यामागे संपूर्ण यंत्रणा उभी केली जाते. भारतात लोकशाही संपली आहे. त्याचे परिणाम भोगावे लागतील. भारतीय जनता गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले.

देशात ईडीची दहशत – मुख्यमंत्री अशोक गेहलोत

देशात ईडीची दहशत असल्याची थेट टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यावेळी केली. बेरोजगारीने देशात हाहाकार माजला आहे. सरकारच्या विरोधात बोलणारांची गळचेपी करण्यात येत असल्याचंही गेहलोत म्हणाले. अशोक गेहलोत म्हणाले की, देशात संविधानाची पायमल्ली केली जात आहे. देशात ईडीच्या दहशतीचे वातावरण आहे. देशात अतिशय धोकादायक खेळ सुरू आहे. माध्यमांनी आज धैर्य दाखवण्याची गरज आहे. आज जर आपण गप्प बसलो तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही, असे गेहलोत म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -