Monday, April 28, 2025
Homeकोकणरायगडकर्जत - खांडसमध्ये पुन्हा बिबट्याचा वावर

कर्जत – खांडसमध्ये पुन्हा बिबट्याचा वावर

हल्ल्यात पाळीव कुत्र्याचा मृत्यू

कर्जत (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातील खांडस दुर्गम भागात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर दिसून आला आहे. या परिसरात राहणाऱ्या नारायण ऐनकर यांच्या पाळीव कुत्र्यावर रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून त्यास ठार केले. या घटनेमुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कर्जत तालुका ग्रीनझोन असल्याने आज ही तालुक्यातील निसर्ग संपदा, जैव -विविधता अबाधित असून येथे घनदाट जंगले आहे. विशेषकरून खांडस परिसर जंगलाने वेढलेला आहे. त्यामुळे या परिसरात मागील काही वर्षात अनेकवेळा बिबट्याचे दर्शन झाले असून यातील काही बिबट्यांनी येथील शेतकऱ्यांच्या शेळ्या-बकऱ्या, गाई यांच्यावर रात्रीच्या वेळेस हल्ला करून फस्त केले आहे.

बिबट्यांची शिकार

मागील काळात तालुक्यात बिबट्यांची शिकार केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या असून आरोपीना अटक सुद्धा झाली आहे. वदप येथे रानडुकरसाठी लावलेल्या फासात बिबट्या अडकून मरण पावला होता. माथेरान मध्येही काही वर्षांपूर्वी एका झाडावर बिबट्या दिसून आला होता.

पाळीव पशुंवरील हल्ल्यात वाढ

या पूर्वीही कर्जत तालुक्यातील खांडस बेलाचीवाडी येथे जंगलात चरण्यास गेलेल्या एका गायीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात गायीचा मृत्यू झाला होता. माथेरान पायथा जंगल परिसरातही काही वर्षांपूर्वी बिबट्याने म्हशीवर हल्ला केला होता. त्यात म्हशीचा मृत्यू झाला होता तर तालुक्यातील अंभेर पाडा ग्रामपंचायत हद्दीतील बेलाची वाडी येथे ही दोन बिबट्यांनी एकाच रात्रीत बारा शेळ्या आणि गायीचा फडशा पाडला होता. एकंदरच कर्जत तालुक्यात बिबट्यांचा वावर असल्याचे नेहमीच विविध घटनांवरून निदर्शनास आले.

ग्रामस्थांमध्ये बिबट्याची दहशत…

बकऱ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे ग्रामीण भागात दहशत पसरली आहे. येथील बहुतेक आदिवासी, शेतकरी बकऱ्या, कोंबड्या पाळतात. त्यामुळे यांच्या वासावर येऊन बिबटे पुन्हा हल्ला करू शकतात. यामध्ये मानवी जीवालाही धोका पोहोचू शकतो, अशी भीती त्यांना वाटत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -