मुंबई (प्रतिनिधी) : परेल येथील लहान मुलांचे आणि प्रसुतीसाठी प्रसिद्ध वाडिया रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. सायंकाळी पावणे सातच्या सुमारास ही आग लागली. दरम्यान लेव्हल दोनची आग असल्याचे जाहीर करण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार रुग्णालयातील यूपीएस रुममध्ये आग लागली. या रुममध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणे, एसी, आणि लाकडी सामग्री असल्यामुळे आग वाढत गेली. आगीमुळे रुग्णालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर धुराचे लोट पसरल्यामुळे रुग्णांना इतर वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाल्याचे समजले नाही. आग लागल्यानंतर लगेचच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाचे ८ फायर इंजिन आणि ६ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. या आगीमागचे नेमके कारण उशीरापर्यंत समोर आले नाही.
दरम्यान आगीची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून आढावा घेतला. तसेच कशामुळे लागली याची चौकशी केली. तातडीने उपयायोजना करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.