Friday, May 9, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपच नंबर वन

ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपच नंबर वन

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने निर्विवाद पहिला क्रमांक मिळविला असून निवडणुकांमध्ये नंबर वन राहण्याची परंपरा पक्षाने टिकविली आहे. तर औरंगाबादमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला असून शिंदे गटाने वर्चस्व मिळवले आहे.


या यशाबद्दल आपण भाजपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत आणि मतदारांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.


चंद्रकांत पाटील म्हणाले की, शुक्रवारी दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार राज्यात ठिकठिकाणी शुक्रवारी मतदान झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी निर्विवाद यश मिळविले असून भाजप पहिल्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मिळविलेल्या विजयाचा विचार केला तर भाजप - शिवसेना युती आपल्या प्रतिस्पर्धी पक्षांपेक्षा खूप पुढे आहे. या यशाबद्दल आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो.


राज्यात सत्ताबदल होऊन भाजप - शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर झालेली ही पहिली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे व त्यामध्ये जनतेने युतीला पसंती दिली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात हिंदुत्वाच्या विचारांचे आणि विकासाचा अजेंडा राबविणारे युतीचे सरकार हवे या भूमिकेतून बदल झाला. त्यानंतर जनतेने दिलेला आशिर्वाद खूप महत्त्वाचा आहे. आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही भाजपाच नंबर वन ठरेल.


औरंगाबादमध्ये शिंदे गटाचे वर्चस्व


औरंगाबादमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला असून १५ ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे वर्चस्व मिळवले आहे. कधीकाळी बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेला १५ पैकी केवळ एका ग्रामपंचायतमध्ये यश मिळाले आहे.


काँग्रेसला एकही ग्रामपंचायत मिळाली नाही. तर भाजपला एका ठिकाणी यश मिळाले. राष्ट्रवादीला एक ग्रामपंचायत मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे औरंगाबादच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला पाहायला मिळाला आहे.


सोलापूरमध्ये भाजपचे वर्चस्व


सोलापूर जिल्ह्यात एकूण २५ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले असून यामध्ये भाजपने मुसंडी मारत ९ ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला आहे.

Comments
Add Comment