नवी दिल्ली : अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने सर्व खाद्य तेल संघटनांना खाद्यतेलाच्या कमाल किरकोळ किमतीत १५ रुपये प्रतिलीटरने तात्काळ कपात करण्याचे निर्देश दिल्याचे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. उत्पादक आणि रिफायनर्सने वितरकांना दिलेली किंमत देखील ताबडतोब कमी करण्याचेही निर्देश मंत्रालयाने दिले आहेत.
उत्पादक/रिफायनर्सकडून जेव्हा जेव्हा वितरकांसाठी किंमती कमी केल्या जातात तेव्हा त्याचा फायदा उद्योगांनी ग्राहकांपर्यंत पोहोचवला पाहिजे आणि विभागाला नियमितपणे माहिती दिली जावी, यावरही विचार करण्यात आला. काही कंपन्यांनी त्यांच्या किमती कमी केल्या नाहीत आणि त्यांची एमआरपी इतर ब्रँडपेक्षा जास्त आहे त्यांनाही त्यांच्या किमती कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. खाद्य तेल संघटनांसोबत झालेल्या बैठकीत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने हे निर्देश दिले.
आयात केलेल्या खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या किमती घसरत चालल्या आहेत, हे खाद्यतेलाच्या परिस्थितीत अतिशय सकारात्मक चित्र आहे आणि म्हणूनच, देशांतर्गत खाद्यतेल उद्योगाला देशांतर्गत बाजारातील किंमती निश्चित करणं आवश्यक आहे, अशी चर्चा या बैठकीत झाल्याचं मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. मे २०२२ मध्ये विभागाने प्रमुख खाद्य तेल संघटनांसोबत बैठक बोलावली. या बैठकीनंतर अनेक लोकप्रिय खाद्यतेलाच्या ब्रँडच्या किमती कमी करण्यात आल्या.
फॉर्च्युन रिफाइन्ड सनफ्लॉवर ऑइलच्या लिटर पॅकची किंमत २२० वरून २१० रुपये आणि सोयाबीन (फॉर्च्यून) आणि काची घणी तेल १ लिटर पॅकची २०५ वरुन १९५ रुपयांपर्यंत कमी करण्यात आली. सरकारने खाद्यतेलांवरील आयात शुल्क कमी केल्यामुळे ते स्वस्त झाले आहेत. कमी शुल्काचा संपूर्ण लाभ ग्राहकांना नेहमीच देण्याचे निर्देश सरकारने दिले.