आबा हे आमच्या घरी पुष्कळदा येत जात असत. महाराजांचे आमच्या घरी येणे जाणे इ.स. १९४० पासून होते. ते आले की ६/८ दिवस आमच्या घरी राहायचे. आबांचे घर १ कि.मी. वर होते; परंतु ते आमच्या घरी राहात. माझी आई त्यांचे पुष्कळ कोड-कौतुक करीत असे. माझी आई माझे एवढे लाड करत नसे, परंतु आबांचे करीत असे. घरी असले तरी त्यांचे भजन, कीर्तन चालूच असे, केव्हा केव्हा शिव्या वगैरे घालणे चालूच असायचे. त्यांचे सर्व वागणे पाहिले तर ते संत पदाला पोहोचले होते. त्यांना नंतर लोक बुवा म्हणून ओळखू लागले व नंतर महाराज म्हणून, लोक त्यांचा सत्कार करू लागले. परंतु महाराजांना त्यांचा काही सादर सत्कार नको होता. त्यांना लोकांना आपण किती मोठे हे दाखवायचे नव्हते तर सरळ साध्या उपदेशातून त्यांना लोकांचे कल्याण करायचे होते. मला मात्र ते माझे मित्र आबा आहेत एवढेच माहीत होते. आमचे नाते कृष्ण-सुदाम्याचे होते. सुदाम्याच्या निस्सीम भक्तीवर जसा कृष्ण आनंदी होता, तृप्त होता. तसाच माझा कृष्ण माझ्यावर. मला त्यांचे फार कौतुक अजूनही त्यांच्या आठवणीने माझे डोळे भरून येतात. बालपणीचे ते दिवस आठवतात. त्यांचे व माझे एकत्र एका ताटात जेवणे, एकत्र झोपणे, एकत्र राहणे. ते दिवस पुन्हा मिळणार नाहीत. आमच्या घरी आजही महाराजांचे पूजन-भजन चालते. महाराजांनी आमचे फार चांगलेच केले. त्यांची आठवण सदैव जन्मोजन्मी राहील. त्यांनी आपले नाव अमर केले. आमचे ग्रामदैवत रवळनाथ. आज गावचे, घरचे, आई-वडिलांचे नाव अमर केले. असे हे साक्षात्कारी राऊळ महाराज हे पिंगुळी गांवचे गावोगावचे व संपूर्ण महाराष्ट्राचे वैभव आहे. आज देशातच नव्हे तर परदेशातही महाराजांचे भक्त आहेत. त्या सर्वांवर त्यांची मायेची पाखर आहे.
– समर्थ राऊळ महाराज