नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात सध्या गांधी परिवाराची ईडी चौकशी सुरू आहे. या दरम्यान आज काँग्रेसने वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात देशव्यापी आंदोलन छेडले आहे. राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसने पंतप्रधान निवास आणि राष्ट्रपती भवनाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना अडवले असून काँग्रेसचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
काँग्रेसच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत जंतरमंतर वगळता इतर सर्व ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तर या आंदोलनाबद्दल काँग्रेस ऑफिसच्या बाहेरही पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या ईडी चौकशीवरून मोदी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला. आपण पंतप्रधान मोदींना घाबरत नाही आणि धमकावून आपला आवाज दाबला जाऊ शकणार नाही, असे ते म्हणाले.
ईडीने आर्थिक घोटाळ्याप्रकरणी बुधवारी दिल्लीतले नॅशनल हेराल्ड कार्यालयातला यंग इंडियन कंपनीचा परिसर सील केला आहे. तर काँग्रसेने दावा केला आहे की, दिल्ली पोलिसांनी त्यांचे मुख्यालय आणि सोनिया गांधी, राहुल गांधीच्या घराभोवती वेढा घातला आहे.