Saturday, July 13, 2024
Homeकोकणसिंधुदुर्गब्रेस्ट कॅन्सर मोफत तपासणी उपचार शिबीर

ब्रेस्ट कॅन्सर मोफत तपासणी उपचार शिबीर

रेडकर हॉस्पिटल, कृष्णा मेडिकल, जिल्हा रुग्णालय यांच्या वतीने १३ ऑगस्टला मालवण येथे आयोजन

मालवण (वार्ताहर) : देशाचा विचार करता दर चार मिनिटांनी ब्रेस्ट कॅन्सरची एक रुग्ण आढळत असून, तर दर १३ मिनीटांनी ब्रेस्ट कॅन्सरची एक रुग्ण मृत्युमुखी पडत आहे. दर २८ पैकी एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता आहे. भारतामधे दर दहा लाख लोकसंख्येमागे ब्रेस्ट कॅन्सरचे २५८ रुग्ण आढळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे हेच प्रमाण ५०० पेक्षा जास्त आहे. गेल्या चार वर्षांमधे रुग्णांच्या प्रमाणात जवळपास २५० रुग्णांची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेडकर हॉस्पिटल आणि रिसर्च ट्रस्ट, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने १३ ऑगस्ट दुपारी २ ते ६ या वेळेत दैवज्ञ भवन, मालवण येथे मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती डॉ. विवेक रेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. शमिका बिरमोळे, डॉ. गार्गी ओरसकर आणि रविकिरण तोरसकर उपस्थित होते.

जिल्ह्यातील कॅन्सर पेशंट हे पुर्णतः कोल्हापूर, बेळगाव, मुंबईच्या भरवशावर कॅन्सरचे उपचार घेताना दिसतात. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील रुग्णांचे वाढते प्रमाण परिस्थितीला अधिकच भयावह बनवत आहे. या पार्श्वभूमीवर ब्रेस्ट कॅन्सरवर शस्त्रक्रिया आणि संशोधन करणाऱ्या डॉ. सुरेश भोसले आणि त्यांच्या टिमला रेडकर हॉस्पिटल रिसर्च ट्रस्ट आणि सिव्हिल सर्जन यांनी आमंत्रित केले आहे. कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेमध्ये चान्सलर डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ब्रेस्ट कॅन्सर उपचार व संशोधन’ चालते. कॅन्सर रुग्णाबरोबर अत्यंत जवळचे रक्ताचे नातेसंबंध असलेल्या नातेवाइकांचे जेनेटिक मॅपिंग करून त्यांना कॅन्सर होण्याची किती शक्यता आहे, हे शोधण्याचे तसेच उपचार आणि संशोधनासाठी पुर्णपणे स्वतंत्र विभाग असलेले हे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले केंद्र आहे.

असेच एखादे पॅलिएटिव्ह व क्युरेटिव्ह उपचार केंद्र कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू केल्यास जिल्ह्यातील सर्वच कॅन्सर रुग्णांचे जीणे सुसह्य होईल. पंतप्रधान जन आरोग्य योजना किंवा महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील रुग्णांचेही यात भले होईल. तसेच भविष्यात या निसर्गरम्य जिल्ह्यात मेडिकल टुरिझमलाही चालना मिळेल, असे डॉ. रेडकर म्हणाले.

डॉ. सुरेश भोसले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या १२ देशांमधे सुमारे १८ संशोधन प्रबंध सादर केले आहेत. विशेष म्हणजे ते सर्व प्रबंध ‘ब्रेस्ट कॅन्सर’ या विषयावरच आहेत. त्यांनी जवळ-जवळ दिड हजार अवघड ब्रेस्ट कॅन्सर शस्त्रक्रिया यशस्वी करून हजारो महिलांना नवजीवन दिले आहे. या शिबिरामध्ये रुग्ण तपासण्यापूर्वी ते महिलांचे या आजाराबाबत थोडक्यात प्रबोधन करणार आहेत. डॉ. सुरेश भोसले यांच्या प्रबोधनानंतर कणकवली येथील स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. शमिका बिरमोळे या सर्व महिलांना मार्गदर्शन करणार आहेत.

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे

स्तन किंवा काखेत नवीन गाठ जाणवणे, स्तनाचा काही भाग जाड होणे किंवा सूज येणे, स्तनाच्या त्वचेची जळजळ/ पूरळ किंवा सुरकुत्या /खड्डा पडणे, स्तनाग्र भागात किंवा स्तनामध्ये लालसरपणा किंवा त्वचा सोलवटणे, स्तनाग्र आत खेचणे किंवा स्तनाग्र भागात वेदना, स्तनाग्र स्त्राव-रक्तस्राव दुधाव्यतिरिक्त इतर कोणताही स्त्राव, स्तनाच्या आकारात किंवा पोत यांत कोणताही बदल, स्तनाच्या कोणत्याही भागात वेदना, कुटुंबामधे अथवा जवळच्या नातेवाइकांमधे स्तनाचा कर्करोग असणे. अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी या शिबिरासाठी नावनोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे विश्वस्त रविकिरण तोरसकर यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -