लालिया, उत्तर प्रदेश : विषारी साप चावल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जात असतानाच मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या लहान भावाचादेखील सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. दोन्ही सख्या भावांचा असा दुर्वैंवी अंत झाल्याने परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. उत्तर प्रदेशातील लालिया पोलीस स्टेशन हद्दीतील भवनियापूर गावत ही घटना घडली.
पोलीस अधिकारी राधा रमण सिंह यांनी सांगितले की, २ ऑगस्ट रोजी अरविंद मिश्रा (३८) यांना साप चावला होता आणि त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे बहराइच येथे निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी लुधियानाहून आलेल्या त्यांचा धाकटा भाऊ गोविंद मिश्रा (३२) आणि त्यांचे नातेवाईक चंदशेखर पांडे हे अंतिम संस्कारानंतर घरीच होते. त्यावेळी रात्री झोपेत असताना विषारी सापाने गोविंद मिश्रा आणि चंदशेखर पांडे यांनाही चावा घेतला. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे गोविंद मिश्रा यांचा मृत्यू झाला. तर, चंद्रशेखर पांडे यांची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनेची माहिती मिळताच मुख्य वैद्यकीय अधिकारी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच आमदार कैलासनाथ शुक्ला यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व शासनाकडून आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.