आर्मेनिया : अझरबैजान आणि आर्मेनियामध्ये पुन्हा एकदा तणाव सुरू झाला आहे. नागोर्नो-कारबाख भागात दोन्ही देशांच्या सुरक्षा दलांमध्ये संघर्ष झाला असून या हल्ल्यात तीन जवान शहीद झाल्याची माहिती आहे.
एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, अझरबैजान लष्कराने ड्रोन हल्ले केल्याचा दावा नागोर्नो-कारबाखमधील लष्करी अधिकाऱ्यांनी केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या हल्ल्यात त्यांचे दोन सैनिक ठार झाले असून १४ जण जखमी झाले आहेत.’
अझरबैजानने आर्मेनियन सैनिकांवर हल्ल्याचा आरोप केला आहे. अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितले की, आर्मेनियन सैन्याने केलेल्या बेकायदेशीर दहशतवादी हल्ल्यात त्यांच्या देशाचा एक सैनिक मारला गेलाय. अझरबैजानने आर्मेनियन सैनिकांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले असून प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात आर्मेनियन दहशतवादी मारले गेल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. या हल्ल्यात काही जण जखमीही झाले आहेत.
नागोर्नो-कारबाख या दोन देशांमधील वाद बराच जुना आहे. हे क्षेत्र सध्या अझरबैजानमध्ये आहे. २०२० मध्ये या भागात युद्धही झाले होते. या युद्धात ६६०० हून अधिक लोक मारले गेले. ६ आठवडे चाललेल्या या युद्धानंतर रशियाने मध्यस्थी करून दोन्ही देशांमध्ये शांतता करार केला. तद्नंतर रशियाने या भागात दोन हजारांहून अधिक सैनिक पाठवले होते.