नवी दिल्ली : भारत ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, इंटेलिजन्स ब्युरोने दिल्ली पोलिसांना धोक्याचा इशारा दिला असून सतर्क राहण्यास सांगितले आहे. इंटेलिजन्स ब्युरोने १० पानांचा अहवाल जारी केला आहे, ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा ते उदयपूर आणि अमरावती या दहशतवादी संघटनांचाही उल्लेख करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनासंदर्भात दिल्ली पोलिसांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आयबीने आपल्या अहवालात कट्टरपंथी गटांच्या धोक्याबद्दल बोलले आहे. तसेच, १५ ऑगस्टसाठी दिल्ली पोलिसांना लाल किल्ल्यावर प्रवेशासाठी कठोर नियम लागू करण्यास सांगितले आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येचाही समावेश आयबीने अहवालात केला आहे. अलीकडेच दिल्ली पोलिसांनी स्वातंत्र्यदिनी वाहतुकीबाबत सूचनाही जारी केली होती.
उदयपूर आणि अमरावतीमधील घटना पाहता, एजन्सींनी पोलिसांना कट्टरपंथी गट आणि गर्दीच्या भागात त्यांच्या कारवायांबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तानची आयएसआय जैश आणि लष्करच्या दहशतवाद्यांना मदत करून दहशतवादी घटनांना भडकावत आहे. दहशतवाद्यांना बडे नेते आणि महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे वृत्त आहे.