संतोष वायंगणकर
महाराष्ट्रातील कोकण हा असा प्रांत आहे. यात निसर्गाने सर्व काही दिलं आहे. कुणालाही हेवा वाटावा, असं सृष्टीसौंदर्य आहे. १२१ किमीचा अथांग समुद्रकिनारा आहे. कोकणातील ग्रामस्थांना मासे, भात आणि फळ असं तिन्ही बाजूने निसर्गनिर्मित दिलं आहे. कोकणातील लोकांची मानसिकता ही अल्पसंतुष्ट आणि समाधानी वृत्ती आहे. फार कष्ट, दगदग न करता जे काही मिळेल त्यावर समाधान मानण्याची मानसिकता त्यांची आहे. त्यामुळे त्यांच्या-त्यांच्या कष्टातून जे काही उभारलेले असेल त्यात ते आनंदी असतात. पूर्वी भातशेतीवरच समाधानी होते. वर्षभरासाठी कुटुंबाला लागणारा तांदूळ शेतातून मिळाला की शेतकरी किती आनंदात असायचा. शेतकरी त्याच्या घरातील भाताच्या भरलेल्या बांबूच्या कणगी दाखवतच त्याच्यातील श्रीमंती तो मिरवत असायचा. नाचणी पीक घेऊन वर्षभराच्या भाकरीची व्यवस्था तो करायचा आणि स्वत:च्याच शेतात पिकविलेल्या भुईमूगाच्या शेंगतेलाची फोडणी घरातील स्वयंपाकात असली पाहिजे, असाच त्याचा प्रयत्न असायचा. त्यामुळे सगळंच आपल्या शेतातलं आपल्या स्वकष्टाने निर्माण केलेल्या कृषी उत्पादनातून असलं पाहिजे, हा त्याचा प्रयत्न होता. पण त्याकाळी कधी व्यावसायिकता शेतकऱ्यापाशी आली नाही.
मधल्या काळात कोकणातून गाव सोडून शहरांकडे नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने जाणाऱ्यांची संख्या वाढली. मुंबईकर ‘चाकरमानी’ होण्याची एक क्रेझ होती. मुंबईत जाऊन वाट्टेल ते काम करण्याची मानसिकता होती; परंतु गावात आपल्याच घरचे काम करण्याची मानसिकता नव्हती. मुंबई, पुणे शहरातून गावात आलेला ‘चाकरमानी’ म्हणून मिरवायचा. आज हे सारंच बदललं. शेती क्षेत्रात आधुनिकता आली. भातांच्या विविध जाती पुढे आल्या. भरपूर उत्पादन देणाऱ्या बियाण्यांची पेरणी, लावणी व्हायला लागली. भाताचे अधिक उत्पादन घेण्याची एक स्पर्धा तरुण शेतकऱ्यांमध्ये सुरू झाली. अलीकडे कोकणातील तरुण शेतकरी शेतात रमताना दिसतो. मधल्या काळात शंभर टक्के फलोद्यान लागवडीची योजना आली.
कोकणात शंभर टक्के फलोद्यान लागवडीत काजू, आंब्याच्या बागायती पडीक जमिनीत उभ्या राहिल्या. आंबा, काजू बागायदार असा एक नवा शेतकरी वर्ग तयार झाला. आंब्याच्या स्वाद आणि रंगाच्या आकर्षणाने जगालाच भुरळ घातली होती. इंग्लंडच्या राजघराण्यातही देवगडचा हापूस फेमस आहे, असे सांगितले जाते. कोकणातील हापूस आंब्याचा एक वेगळाच स्वाद आहे. आता आंब्याच्या असंख्य जाती बाजारात आल्या आहेत. हापूस आंबा म्हणून परराज्यातील आंब्याची विक्री केली जाते. काजूच्याही खूप बागा तयार झाल्या आहेत. कोकणातील काजुगरालाही सर्वत्र मागणी आहे. आंबा, काजू, कोकम, जांभूळ, करवंद अशी अनेक फळं कोकणात पिकतात. या सर्व फळांची विक्री कोकणात आणि कोकणाबाहेरही होते; परंतु या फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग काही कोकणात उभे राहू शकले नाहीत. आंबा, काजू, कोकम, जांभळावर प्रक्रिया केली जाते; परंतु त्याला फारच मर्यादा आहेत. एकट्या देवगडमध्ये कोट्यवधी रुपयांची आंब्यावर प्रक्रिया करणारा उद्योग उभा राहू शकला नाही. काही बागायतदारांनी प्रक्रिया उद्योग सुरू केले; परंतु त्यालाही मर्यादा आल्या. देवगड तालुका आंबा उत्पादक संघाने आंबा साठवण केंद्र उभं केलं; परंतु त्यातही फार यश येऊ शकलं नाही. एकदा कोलमडून पडल्यावर पुन्हा उठून उभं रहाण्याची त्यांची मानसिकता उरत नाही. जांभूळ ज्यूस मधुमेहींवर फार उपयुक्त मानला जातो; परंतु जांभळावर प्रक्रिया करणारा एखादा स्वतंत्र उद्योग उभा राहू शकला नाही. तीच स्थिती करवंदांच्या बाबतीत. लोणचं बनवण्यासाठी कच्चे करवंद वापरले जाते; परंतु तयार करवंदाचे फळ टिकत नाही. त्याचा अन्य कोणता उपयोग करता येईल, प्रक्रिया करून काय करता येईल? हा विचार करण्याची आवश्यकता आहे. कोकणातील यातील काही फळांचा फ्लेव्हर आईस्क्रीममध्येही देण्यात आला आहे. जांभूळ, शहाळं याचा आईस्क्रीमध्ये वापर केला जातो; परंतु आपल्याकडे जी फळे पिकतात, ती विकलीही जातात; परंतु दुर्दैवाने ती फळे टिकविण्यासाठी आवश्यक असणारी ‘कुलिंग’ सुविधा कोकणात उपलब्ध नाही. पश्चिम महाराष्ट्रात फळप्रक्रिया उद्योग उभे झाले आहेत. यामुळे तिथे पिकणाऱ्या सर्व फळांवर प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया उद्योगात असल्याने त्या-त्या फळांपासून काही खाद्यप्रकार तयार केले जात आहेत.
मार्केटिंग आपणाला जमत नाही. ‘हवं तर येतील आणि घेतील’ हे यापुढच्या काळात चालणारे नाही. तुम्ही उत्पादित केलेली वस्तू अधिक चांगली कशी आहे, हे स्पर्धेत सांगता यायला पाहिजे. कोकणात सर्व काही पिकतंय त्याची विक्रीही होतेय; परंतु फळप्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून त्याची विक्री व्यवस्था झाली पाहिजे. रत्नागिरीत भिडेंचे योजक, देवगडमध्ये ठाकूरांच्या द्वारका फुड्स, सुहास गोगटे यांनीही आंब्यावर प्रक्रिया उद्योग उभारला आहे. असे बागायतदारांनी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न चालविले आहेत. तयार झालेल्या आंब्याला शीतगृहात ठेवण्याची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. भविष्यात या सर्वांची गरज आहे. केवळ इथे पिकून उपयोग नाही. त्यावर प्रक्रिया केली गेली, तर त्याचा शेतकरी बागायतदारांना अधिक फायदा होईल. कोकणात आर्थिक समृद्धी येईल.