मुंबई (प्रतिनिधी) : भांडुप संकुल येथील तानसा जलवाहिनीच्या कामासाठी मुंबई शहरासह उपनगरात गुरुवारी १५ टक्के पाणी कपात केली जाणार आहे. तर ठराविक परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. मुंबई पालिकेकडून भांडुप संकुल येथील जुन्या महासंतुलन जलाशयापासून सुरू होणाऱ्या तानसा जलवाहिनीचे, बीपीटी लाईनचे (ब्रेक प्रेशर टनेल) व नवीन महासंतुलन जलाशयातून निघणाऱ्या तानसा जलवाहिनीबरोबर छेद जोडणी करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष उदंचन केंद्रातील दोन १२०० मिलीमीटर व्यासाच्या स्लुईस झडपा बदलणे आणि येवई येथे नवीन तानसा जलवाहिनीवरील क्लोरिन इंजेक्शन लाईनवरील झडप बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम गुरुवार दिनांक ४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबई शहर व दोन्ही उपनगरात १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. याच कालावधीत ठराविक परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.
दरम्यान पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे व शहर या विभागातील संपूर्ण क्षेत्रात पाणीपुरवठ्यामध्ये १५ टक्के पाणी कपात करण्यात येईल. एस विभाग गावदेवी टेकडी, सर्वोदय नगर येथे पाणी पुरवठा बंद राहील. त्यानंतर कांजुर (पश्चिम) ते विक्रोळी स्थानकासह लालबहादूर शास्त्री मार्गालगतचा दोन्ही बाजूंचा परिसर, सुर्यानगर, चंदन नगर, विक्रोळी स्थानक मार्ग (पश्चिम) येथेहीपाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. रमाबाई नगर I आणि II , दिन्शॉ पूल ते भांडुप जलाशय परिसर (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून साई हिल, टेंभीपाडा, एँथोनी चर्च, कामराज नगर परिसर, पाटकर कंपाऊंड परिसर महाराष्ट्र नगर, फरिद नगर, काजू टेकडी, कांबळे कंपाऊंड येथे (पहाटे ५ ते सकाळी १० वाजता – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.