सीमा दाते
मुंबई : भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुंबईत १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ म्हणजेच ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाचा भाग म्हणून मुंबई महापालिकेकडून मुंबईत झेंड्याचे वाटप करण्यात येत आहे. मंगळवारपासून मुंबईत विविध ठिकाणी हे वाटप सुरू झाले असून आतापर्यंत ६ लाखांहून अधिक झेंड्यांचे वाटप करण्यात आले आहे. यंदाचा स्वातंत्र्य दिन हा काही वेगळाच आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांनुसार देशभरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे, तर मुंबई महापालिकेने देखील यात सहभाग घेतला आहे आणि याचाच भाग म्हणून मुंबई महापालिका हर घर तिरंगा अभियान राबवत असून या अभियानाच्या अंतर्गत मुंबईतील झोपडपट्टीतील चाळीत, वसाहती, मध्यम वर्गीय सोसायटी, उंच इमारती, पालिका, खासगी व सरकारी कार्यालये आदी ठिकाणी भारतीय तिरंगा फडकविण्यासाठी पालिकेकडून झेंड्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे, तर यात ३५ लाख झेंडे वाटपाचे नियोजन असून आतापर्यंत ६ लाखांहून अधिक झेंड्यांचे वाटप करण्यात आले आहे.
या अभियानाअंतर्गत केवळ झेंड्याचेच वाटप नाही, तर इतरही नियोजन पालिकेने केले आहे, त्यानुसार पालिकेने वेगवेगळी तयारी केली असून पालिका कामाला लागली आहे. पालिकेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा देणारे ५०० होर्डिंग लावण्याचे नियोजन केले आहे.
३०० केंद्रांवरून करणार ५ लाख झेंडे वाटप
पुणे : पुणे पालिकेच्या ३०० केंद्रांवरून करणार ५ लाख झेंड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १३ ते १५ ऑगस्टपर्यंत हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या ३०० केंद्रांवरून ५ लाख झेंडे वाटप करण्यात येणार आहेत. नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी, यासाठी ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविला जाणार आहे. त्यामध्ये नागरिकांनी घरावर तिरंगा झेंडा लावून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी पालिकेने पाच लाख झेंडे विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेकडे ४ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने तिरंगा झेंडे उपलब्ध होणार आहेत.