Saturday, March 15, 2025
Homeकोकणरायगडमहाडमधील नद्यांनी गाठला तळ! शेतकरी चिंतेत

महाडमधील नद्यांनी गाठला तळ! शेतकरी चिंतेत

महाड (वार्ताहर) : जूनमध्ये दांडी मारलेल्या पावसाने सर्व बॅकलॉग जुलैमध्ये भरून काढला. त्यामुळे रायगडमधील अनेक नद्या धोका पातळीवरुन वाहत होत्या. मात्र जुलैच्या शेवटी पावसाने चांगलीच दांडी मारली आहे. यामुळे जिल्ह्यातील सावित्री, गांधारी आणि काळ नद्यांची पाणी पातळी कमी झाली आहे. काही नद्यांचे पात्र तर कोरडे पडले असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

जुलै महिन्यात धोकादायक वाटणारा पाऊस अचानक गायब झाल्याने तालुक्यातील नद्यांनी तळ गाठला आहे. महाडसह संपूर्ण कोकणात पावसाचे प्रमाण अधिक आहे. महाड आणि पोलादपूरमध्ये तर पावसाची मुसळधार असते. दोन्ही तालुक्यात सरासरी ३ ते ४ हजार मिमी पावसाची नोंद होते. तालुक्यातील उंच भागात पावसाचे प्रमाण यापेक्षा वेगळे आहे. महाड तालुक्याच्या शेजारी असलेल्या महाबळेश्वरमधील पावसाचे प्रमाण याहून अधिक असल्याने येथील पावसाच्या पाण्याचा प्रभाव महाड आणि पोलादपूरमध्ये जाणवतो. जुलै महिन्यात नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने पडणारा पाऊस कमी होऊन देत नाही. मात्र यावर्षी पावसाने अचानक दांडी मारल्याने महाड तालुक्यातील नद्यांनी तळ गाठला आहे.

जून महिन्यात पाऊस उशिराने सुरू झाल्याने आणि जुलै महिन्यातदेखील पावसाने मारलेली दांडी यामुळे शेतकऱ्यांच्या भातलावणीदेखील लांबणीवर गेली. शेतकरी भाताची रोपे करपतात की काय, या भीतीने चिंतेत सापडले आहेत. नद्यांनी तळ गाठल्याने दुष्काळाची चाहूल करून दिली की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाड तालुक्यातून सावित्री, गांधारी आणि काळ या नद्या ऐन पावसाळ्यात तुडुंब भरून वाहतात. मात्र पाऊस कमी होताच तत्काळ तळ गाठतात.

महाडमध्ये जूनमध्ये २९९ मिमी पावसाची नोंद झाली. तर जुलै महिना संपल्यानंतर अवघ्या १६९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे तालुक्यातील कोथुर्डे, आंबिवली, कुर्ले, धरणातील पाणीसाठा पाऊस थांबताच कमी झाला आहे. ओसंडून वाहणारी धरणे आता मंदावली आहेत. ग्रामीण भागातील नद्यानाल्यांची पातळी कमी झाली असल्याने आणि पावसाचे प्रमाण असेच राहिले तर पिण्याच्या पाण्याचे स्रोत लवकरच आटून जातील, अशी भीती वर्तवली जात आहे. कोकणात भातपिकाला लागणारा पाऊस, पिण्याचे पाण्याचे स्रोत मे महिन्यापर्यंत टिकायचे असतील तर पावसाचे प्रमाणातील सातत्य कायम राहणे गरजेचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -