सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिया आवळेकर यांनी देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका होण्याचा मान मिळवला आहे. प्रशासनाने त्यांचे स्वागत देखील केले. रिया आवळेकर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून त्यांचे अगोदरचे नाव प्रविण असे होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील तुळसुली गावातील प्रवीण वारंग यांना लहानापासून शिक्षणात आवड होती. त्यांच्या काकीने त्यांना अध्यापक अर्थात शिक्षक बनायला सांगितले. त्यामुळे प्रवीण शिक्षक बनला. प्राथमिक शाळेपासून ते डीएडपर्यंत शिक्षण घेत असताना आपण पुरुष नसून स्त्री असल्याची भावना प्रवीणच्या मनात खदखदत होती. लहान असल्याने घरात सांगू शकत नव्हते. मात्र मनाची कायम घुसमट होत होती. जसजसे वय वाढत जात होत तसतसे आपण पुरुष नसून स्त्री असल्याची भावना अधिक दृढ होत होत्या. मात्र त्यांनी स्वतःचे अस्तित्त्व निर्माण करत प्रवीणपासून रिया आवळेकर असा प्रवास केला.
प्रवीण यांनी २०१९ मध्ये आपली सर्जरी केली. त्यानंतर देखील त्यांनी पुरुषी वेशात आपले अध्ययनाचे काम सुरु ठेवले. मे २०२२ मध्ये त्यांनी आपण तृतीयपंथी असल्याची माहिती त्यांनी प्रशासनाला दिली. त्यात जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले. प्रवीणची रिया आवळेकर झाली आणि देशातील पहिल्या तृतीयपंथी शिक्षिका होण्याचा मान देखील मिळवला.
देशातील पहिली तृतीयपंथी शिक्षिका असल्याचा आज अभिमान आहे. यासाठी मला माझं कुटुंब तसेच जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाने खूप सहकार्य केले. आज रिया आवळेकर या पहिल्या तृतीयपंथी शिक्षिका असल्या तरी देखील काही तांत्रिक बाबी लक्षात घेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजोत नायर यांच्या इथे स्वीय सहाय्यक म्हणून तात्पुरतं काम पाहत आहेत.