
मुंबई (वार्ताहर) : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू प्रभात कोळीने नुकतेच अमेरिकेतील लेक टाहो (३५ किमी) अंतर १२ तास ३७ मिनिटांत पार करत अशी कामगिरी करणारा आशिया खंडातील प्रथम जलतरणपटू होण्याचा मान मिळविला. त्याचप्रमाणे वर्ल्ड ओपन वॉटर स्वीमिंग असोसिएशनचा कॅलिफोर्नियन ट्रिपल क्राऊन पटकावणारा देखील आशिया खंडातील तो पहीला जलतरणपटू ठरला.
कॅलिफोर्नियन ट्रिपल क्राऊन या वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग असोसिएशनच्या नामांकनामध्ये अमेरिकेतील कॅटलिना चॅनेल (३४ किमी) सान्ताबार्बारा चॅनेल (२० किमी) तसेच लेक टाहो लेंगथ स्विम (३५ किमी) या अतिशय खडतर जलतरण मोहिमांचा समावेश आहे. प्रभात कोळीने तिन्ही आव्हाने यशस्वीरित्या पार करत आशिया खंडातील प्रथम जलतरणपटूचा मान मिळविला.
प्रभातने कॅटलिना चॅनेल २०१६ मध्ये सांताबार्बरा येथील चॅनेल २०१९ मध्ये व लेक टाहो लेंग्थ स्विम हे आव्हान नुकतेच पार केले. समुद्र सपाटीपासून १८०० मीटर उंचीवर स्थित लेक टाहो लेंग्थ (३५ किमी) पोहणे हे अतिशय खडतर आव्हान आहे. समुद्र सपाटीपासून उंचीवर असल्यामुळे विरळ ऑक्सिजन त्याचप्रमाणे लेकचे पाणी ९९ टक्के शुद्ध असल्यामुळे पाण्याची घनता कमी असल्याने पोहण्यास अतिशय कठीण शिवाय जलतरणाची वेळ रात्रीची, या सर्व आव्हानांवर मात करत प्रभातने ही मोहीम फत्ते केली.