Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरजव्हार आदिवासी भागात ‘‘वाडी मॉडेलचे’’ प्रायोगिक उपक्रम

जव्हार आदिवासी भागात ‘‘वाडी मॉडेलचे’’ प्रायोगिक उपक्रम

पारस सहाणे

जव्हार : समाजातील शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी टाटा मोटर्सने इन्स्टिट्युट फॉर सस्टेनेबल लाइव्हलीहुड्स अॅण्ड डेव्हलपमेंट (बायएफ)च्या सहयोगाने जिल्ह्यातील जव्हार आदिवासी भागात ‘वाडी मॉडेलचे’ प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम राबविण्यात येत आहे. या सर्वांगीण मॉडेलने अन्न सुरक्षा वाढवून, शाश्वत उत्पन्न निर्माण करून, आरोग्य सुविधेचा पुरवठा करून आणि उत्पादन केलेल्या शेतमालाची गुणवत्ता व प्रमाण सुधारण्यासाठी तंत्रज्ञान माहितीची देवाणघेवाण करून सुमारे दोन हजार शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाला आमूलाग्र कलाटणी दिली आहे. या मॉडेलचा वापर पुणे व सानंद या ठिकाणी करण्याचे विचाराधीन आहे.

हा उपक्रम सुरू झाल्यापासून या शेतकऱ्यांनी दोन लाख ७० हजार झाडे लावली असून एक हजार एकरपेक्षा जास्त जमिनीचे संवर्धन केले आहे. जव्हार येथील पाथर्डी, चौक व शिरोशी या तीन ग्रामपंचायतींमधील आदिवासी समुदायांसह सहभागी नियोजनाद्वारे विकसित केलेल्या या वाडी मॉडेलला यश लाभेले आहे. हे मॉडेल पालघरमधील इतर आसपासच्या भागात पसरू लागेल आहे. वाडी मॉडेल अंतर्गत प्रयत्न सुरू ठेवण्यासाठी टाटा मोटर्स पाच लाख झाडे लावण्याचा निर्धार केला आहे. यामुळे टाटा मोटर्स दोन हजार एकर पडीक जमिनीचे लागवडीयोग्य जमिनीत रूपांतर करण्याचा तसेच या उपक्रमात नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला शाश्वत उदरनिर्वाहाचे स्थिर साधन विकसित करण्यासाठी मदत करण्याचा मनसुबा आहे.

या मॉडेल अंतर्गत प्रत्येक सहभागी कुटुंबाच्या मालकीच्या एक एकर कमी वापरात असलेल्या जमिनीवर आंबा व काजूसह ६० प्रकारची फळझाडे व २५० ते ३०० वनीकरणाची झाडे लावण्यात आली. या झाडाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जळाऊ लाकूड, पशू खाद्य उपलब्ध होणार आहे.

प्रत्येक कुटुंबाला रोपे देण्यासाठी टाटा मोटर्सने जव्हारमध्ये सहा रोपवाटिका विकसित केल्या आहेत. दुसऱ्या बाजूला सरकार मनरेगासारख्या योजनांतर्गत शेतकऱ्यांना खोदणे, खड्डा खणणे, भराव भरणे इत्यादी कामांसाठी मंजूरी मिळवून देण्यास मदत करते. तसेच शेतकऱ्यांवर रोपांची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवली जाते. नव्याने लागवड केलेल्या रोपांना वर्षभर पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता काही स्वपूर्ण सेवाभावी संस्था व शासनाच्या इतर विभागातील योजनांमधून जलस्रोतांतील गाळ काढणे, त्यांना पुनर्जीवित करणे, शेततळे निर्माण करणे तसेच सौर ऊर्जेच्या मदतीने उपसा सिंचनासाठी प्रकल्प रावबविण्यात येत आहेत.

हे मॉडेल वृक्षारोपण, मृदा संवर्धन, जलस्त्रोत विकास, आर्द्रता संवर्धन, सुधारित पोषण आणि जीवनाचा दर्जा यांसारख्या पर्यावरणीय गरजांच्या विस्तृत श्रेणीची पूर्तता करते. याशिवाय, सध्याच्या मॉडेलमध्ये सादर करण्यात आलेल्या कृषी उत्पादनांचे एकत्रीकरण, प्रक्रिया आणि विपणन उपक्रमांनी शेतकऱ्यांमध्ये क्षमता वाढवली आहे. या मॉडेलचे फायदे भूमिहीन कुटुंबांना रोपे व फळ रोपवाटिका, गांडूळ खत उत्पादन, पेटी शॉप्स यांसारख्या लघू उद्योगांच्या माध्यमातून दिले जातात. या मॉडेलमध्ये झाडांची रोपे विनामूल्य पुरविली जात असून मनरेगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचे साधन निर्माण करताना लागवडीदरम्यान केलेल्या श्रमाचा मोबदला मिळत आहे. या मॉडेलचा आधार घेऊन राज्यातील इतर ग्रामीण भागांत असेच प्रकल्प राबविण्याचा टाटा मोटर्सतर्फे मानस व्यक्त करण्यात आला आहे.

वाडी मॉडेलचे उद्दिष्ट पर्यावरणीय स्थिरता प्रबळ करताना स्थिर उदरनिर्वाहाला चालना देण्याचे आहे. प्रभाव वाढवण्यासाठी अधिक अर्थपूर्ण बदलांचा समावेश करून, अधिक शाश्वत भविष्याकडे नेण्याचे प्रयत्नशील राहू.’’ – येसजेआर कुट्टी, चीफ ऑफिसर – टाटा मोटर्स

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -