Thursday, April 24, 2025
Homeकोकणरायगडराज्य शासनाकडून पीक उत्पादक वाढीसाठी रायगडमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

राज्य शासनाकडून पीक उत्पादक वाढीसाठी रायगडमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन

अलिबाग : राज्यातील उत्पादकता वाढीसाठी राज्य शासनाकडून एक अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन इतर शेतकऱ्यांना मिळावे, पीक उत्पादनात वाढ व्हावी, तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा, या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने तृणधान्य व कडधान्य पिकांची राज्यांतर्गत पीक स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा तालुका पातळी, जिल्हा पातळी, विभाग व राज्य पातळी या स्तरांवर आयोजित केली आहे. स्पर्धेत विजयी शेतकऱ्यांना रोख बक्षीसही दिले जाणार आहे.

यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नागली, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल ही पिके खरिपात, तर ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ या पिकांसाठी रब्बीत पीक स्पर्धा होईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किमान १० गुंठे लागवड क्षेत्र आवश्यक असणार आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनीचा सात बारा, आठ अ, आदिवासी बांधवांनी जातीचा दाखला देणे आवश्यक आहे.

पीकनिहाय प्रत्येकी ३०० रुपये स्पर्धेचे प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे. तालुका कृषी अधिकारी या स्पर्धांचे आयोजन करणार आहे. त्यासाठी शेतकऱ्याला किमान दहा आर. क्षेत्रावर सलग लागवड करावी लागेल. तालुकास्तरावर सर्वसाधारण गटासाठी १० पेक्षा कमी व आदिवासी गटात पाचपेक्षा कमी अर्ज आल्यास स्पर्धा रद्द केली जाणार आहे. तृणधान्य आणि कडधान्य पिकांची स्पर्धा ही तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवर घेतली जाणार आहे. गावपातळीवर पहिले बक्षीस पाच हजारांचे असेल तर राज्यपातळीवर पहिले बक्षीस ५० हजार रुपयांचे असणार आहे.

राज्य शासनाकडून उत्पादकता वाढविण्यासाठी ही स्पर्धा घेतली जाते. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही याचा लाभ होत असतो. प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन मिळत असते. शेतकऱ्यांना आपली उत्पादकता वाढविणे लाभदायक ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करीत आहे. – उज्ज्वला बाणखेले, जिल्हा कृषी अधिकारी, रायगड

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -