देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षांत भाजपशी लढण्याचे सामर्थ्य आता राहिलेले नाही. महाराष्ट्रात शिवसेनाही संपायला लागली आहे. काँग्रेसचेही अनेक राज्यांतून गाशा गुंडाळणे सुरू आहे. उर्वरित सर्व पक्षही संपतील, देशात केवळ भाजप राहील, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मंगळवारी बिहार येथील एका कार्यक्रमात केला आणि यावरून देशभरातील राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून देशभरात जाळे असलेला काँग्रेस पक्षही आता कमकुवत झालेला दिसत आहे. गेल्या दहा वर्षांत काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला उभारी मिळू शकली नाही, हे वास्तव आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप केंद्रात सत्तेत आल्यानंतर पक्षाच्या विस्ताराच्या कक्षा वाढलेल्या दिसून येत आहेत. नरेंद्र मोदी २०१४ मध्ये सत्तेवर आले, तेव्हा देशातील १४ राज्यांमध्ये काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांचे सरकार होते.
भाजपची आजच्या घडीला १९ राज्यांत सत्ता आहे, तर लोकसभा आणि राज्यसभेत बहुमत असल्याने, अनेक लोकहिताचे निर्णय त्यांना घेता येत आहेत. राष्ट्रीय विचारधारेवर विश्वास ठेवून राजकारण करणारे पक्ष असावेत, अशी सर्वसाधारण भावना निर्माण झाली आहे. त्याची कारणेही तशीच आहेत. देशाच्या राजकारणात घराणेशाहीवर आधारित अनेक पक्ष आहेत. लोकशाहीच्या गप्पा मारायच्या आणि घराणेशाहीतून एका पिढीतून पुढच्या पिढीत नेतृत्वाची धुरा द्यायची, अशी अनेक उदाहरणे महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत दिसून येतात. निवडणूक आयोगाने प्रदोशिक पक्षांनाही मान्यता दिलेली असली, तरी या प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व एका ठरावीक क्षेत्रफळासाठी मर्यादित असते आणि त्यांचे नेतृत्वदेखील मर्यादित व एकाधिकार पद्धतीचे असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर त्यांचा विशेष प्रभाव पडत नाही, हे नव्याने सांगायला नको. मात्र केंद्रात सत्तेवर येत असलेल्या सरकारला बहुमतासाठी प्रादेशिक पक्षांची मदत घ्यावी लागली, तर या प्रादेशिक पक्षांकडून सत्ताधाऱ्यांकडून अनेक गोष्टी पदरात पाडून घेण्याचा कल असतो.
मागील लोकसभा निवडणुकीतील सत्ताधारी पक्षाच्या खासदारांच्या संख्याबळाकडे दृष्टिक्षेप टाकला, तर आघाडीचे सरकार म्हणून ते अस्तित्वात आले आहे. काँग्रेसप्रणीत यूपीए सरकार आणि भाजपप्रणीत एनडीए सरकार म्हणून त्यांनी राज्यकारभार केला आहे. वाजपेयी यांच्या एनडीए सरकारच्या कार्यकाळाचा विचार करता, मित्रपक्ष असलेल्या ममता, जयललिता आणि समता या तिघांनी अनेकदा आपल्याच सरकारला धारेवर धरून कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. समता म्हणजे जॉर्ज फर्नांडिस आणि नितेश कुमार यांचा पूर्वीचा पक्ष. काँग्रेसला सत्तेवर असताना आपल्यासोबत असलेल्या घटक पक्षांची अनेकदा मनधरणी करावी लागली होती. २०१९ साली मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ३०० आकडा पार केल्याने, अधिक सक्षमतेने काम करता येते, याचा अनुभव विद्यमान भाजप अध्यक्ष नड्डा यांना आला असावा व त्यामुळे शतप्रतिशत भाजपचा प्रयोग राज्या-राज्यांत केला जात आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने १५ मार्च २०१९ रोजी जाहीर केलेल्या राजकीय पक्षांच्या यादीनुसार, भारतामध्ये एकूण २ हजार ३३४ राजकीय पक्ष असून, त्यापैकी ८ राष्ट्रीय पक्ष आहेत. यापैकी महाराष्ट्रात एकूण १४५ नोंदणीकृत पक्ष आणि २ राज्यस्तरीय (मनसे व शिवसेना) असे पक्ष आहेत. भारतीय शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय जनता पक्ष व नॅशनल पीपल्स पार्टी असे फक्त आठ राजकीय पक्ष अखिल भारतीय स्तरावर मान्यताप्राप्त आहेत. जनता दल युनायटेड, अण्णाद्रमुक, द्रविड मुन्नेत्र कळ्हम, शिवसेना यांसारख्या एकूण ३८ राजकीय पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात मान्यता असून इतर २,३०१ नोंदणीकृत पक्ष आहेत. देशातील ४०४ पक्षांच्या नावात ‘भारत किंवा भारतीय’ हे शब्द होते. तामिळनाडूची लोकसंख्या ७.२ कोटी आहे, त्या राज्यात १४० राजकीय पक्ष आहेत. म्हणजे पाच लाख लोकांमागे एक पक्ष. ४.९ कोटी लोकसंख्या असलेल्या आंध्र प्रदेशात ८३ पक्ष होते.
ममता बॅनर्जी यांनी १ जानेवारी १९९८ रोजी स्थापन केलेला अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे; परंतु मुख्यत्वे तो पश्चिम बंगालमध्ये राजकीयदृष्ट्या क्रियाशील आहे. याचा प्रभाव मेघालय राज्यात असला, तरी देशभर भाजपला कसा टक्कर देणार? हा प्रश्न आहे. घराणीशाहीचा वारसा सांगणारा दक्षिण भारतातील तेलुगू देशम पक्ष हा आंध्र प्रदेशात लोकप्रिय पक्ष असून एन. टी. रामाराव यांनी १९८२ रोजी त्याची स्थापना केली होती. त्यांचे जावई चंद्राबाबू नायडू हे या पक्षाचे सध्या नेते आहेत. उत्तरेत मुलायम सिंह यांचा मुलगा अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष, लालुप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाची सूत्रे त्यांचा मुलगा तेजस्वी यादव सांभाळत आहे. महाराष्ट्रात शिवसेनेसारख्या पक्षात घराणेशाही आहे. बिजू जनता दल हा बिजू पटनायक स्थापित पक्षाचा ओदिशा राज्यात प्रभाव आहे. नवीन पटनायक हा मुलगा पक्षाची धुरा सांभाळत आहे.
ही उदाहरणे म्हणून आपण पाहत असलो, तरी अनेक राजकीय पक्षांचा प्रभाव हा त्या त्या कार्यक्षेत्रात असल्याचे दिसून येत आहे. देशाची राष्ट्रीय एकात्मता टिकविण्यासाठी राष्ट्रीय पक्षाच्या खांद्यावर देशाची धुरा असायला हवी. देशातील वंशवाद आणि घराणेशाही असलेल्या पक्षांचे अस्तित्व धोक्यात येईल, असा आशावाद भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला असेल, तर त्यात गैर काय आहे? हेच सत्य असल्यामुळे ते स्विकारणे आजच्या काळाची गरज आहे.