रत्नागिरी (वार्ताहर) : विद्यार्थ्यांना पोषण आहार देताना त्याची प्रथम मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन कमिटीने पाहणी करणे व चव घेणे गरजेचे आहे. संपूर्ण आहार शिजवून झाल्यानंतर, त्याची पूर्णपणे टेस्ट घेतल्यानंतर काही वेळानंतरच तो विद्यार्थ्यांना द्यावयाचा आहे. मात्र शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे रत्नागिरी शहरातील एका शाळेत विद्यार्थ्यांना कच्चा भात देण्यात आला. तो विद्यार्थ्यांनी चांगला नसल्याने फेकून दिला. त्यानंतर विद्यार्थ्यांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रत्नागिरी प्रभारी शिक्षणाधिकारी स्नेहल पेडणेकर यांनी शिक्षकांची चौकशी करून त्यांच्यावर उचित कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून स्पष्ट केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार शिजवून दिला जातो. मात्र पोषण आहार देण्या अगोदर पाहणी करणे, त्याची टेस्ट घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, अनेक शिक्षक तसेच मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन कमिटीही मोबइलमध्ये गुंग असते. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराकडे लक्ष कोण देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक शाळांमधून शिक्षक व्यवस्थित काम करतात. त्यांच्या कोणत्याही तक्रारी येत नाहीत. मात्र काही शाळा त्याला अपवाद आहेत. भरमसाट पटसंख्या, विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याचा भाव यामुळे पोषण आहार करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. रत्नागिरी शहरासह अनेक ठिकाणी पोषण आहाराची वरिष्ठ पातळीवर अधिकारी तपासणीच करीत नाहीत. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यांना घरुन पाणी आणायला सांगितले जाते. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांचीही चांगली व्यवस्था नसल्याने अनेक मुले हिरमुसली होतात. तसेच शाळेमधील वातावरणही आनंदी असणे गरजेचे आहे.
भरमसाट विद्यार्थी घेऊन आपण मोठे महान कार्य करतोय अशा अाविर्भावात अनेकजण असतात. परंतु या विद्यार्थ्यांकडे पुरेशा प्रमाणात लक्षच दिले जात नाही. विद्यार्थ्यांना कच्चा भात देणाऱ्यांवर आणि त्याची तपासणी करणाऱ्यांवर कोणती कारवाई होणार? याची चर्चा शहरासह जिल्ह्यात सुरु झाली आहे. अनेक वेळा या शाळांना मंत्री, जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी भेटी देतात. परंतु केव्हाही स्वयंपाक घरात जाऊन तेथील अन्नाची तेथील पोषण आहाराची पाहणी केली जात नाही. रत्नागिरी प्रभारी शिक्षणाधिकारी स्नेहल पेडणेकर यांनी शिक्षकांची चौकशी करून त्यांच्यावर उचित कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून स्पष्ट केल्याने पोषण आहारासारख्या गंभीर बाबीकडे जिल्हाभरातील सर्वच शाळा आता दक्ष राहून लक्ष देतील, अशा आशा निर्माण झाल्या आहेत.
शिक्षकांची चौकशी करून उचित कारवाई करणार – प्रभारी शिक्षणाधिकारी स्नेहल पेडणेकर