
मोखाडा (वार्ताहर) : मोखाडा तालुक्यात वरुणराजाने अवकृपा केल्याने भात नागली व वरईची पिके उन्हामुळे करपू लागल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. ऐन पावसाळ्यात पिकांना कडक उन्हाळ्यासारखी परिस्थिती उद्भवल्याने नागली व वरईची रोपे पिवळी पडून संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत, तर लावणी केलेली पिके कडक उन्हामुळे करपू लागली आहेत.
चालू वर्षी जुलै महिन्याच्या सुरवातीला पाऊस चांगला पडल्यामुळे शेतकऱ्यांनी भात पिकाची लावणी मोठ्या आनंदाने केली. मात्र हा आनंद निसर्गाने शेतकऱ्यांकडून हिरवून घेतला आहे. मोखाडासारख्या आदिवासीबहुल भागात खरीपामध्ये नागली, वरई यांसारखी प्रमुख पिके घेतली जातात. गेल्या सात ते आठ दिवसांपासून या भागात पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे नागली, वरई या पिकांची रोपे लागणीच्या टप्प्यात आली असून पावसाअभावी करपून चालली आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
खरीप हंगामात पावसाची गरज असताना पावसाने ओढ दिली असून नागली, वरईसाठी अपेक्षित पावसाची गरज आहे. पाऊस नसल्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत, तर नागली, वरईची लावणी केलेल्या रोपांची उन्हामुळे पिके करपू लागली आहेत. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे.
जव्हार, मोखाडा तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या नागली, वरीचे पीक उन्हामुळे सुकून गेले आहे. गेल्या पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून कडक ऊन पडत आहे. त्यामुळे तृणधान्य पीक असलेली नागली, वरी शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून तातडीने शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. - प्रदीप वाघ, सदस्य, मोखाडा पंचायत समिती
यंदाही उत्पादनात घट होण्याची शक्यता
मृग व आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीला काहीशा प्रमाणात पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांची शेती कामांची लगबग सुरू केली. मात्र त्यानंतर कडक ऊन पडून रोपे पिवळी पडू लागली. मोखाडा तालुक्यात सात ते आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खोडाळा परिसरातील नागलीचे पीक करपू लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, यंदाही नागली व वरईच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.