
बर्मिंगहॅम : राष्ट्रकुल स्पर्धेच्या सहाव्या दिवशीही वेटलिफ्टिंगमध्ये दमदार कामगिरी केली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला नववे पदक मिळाले आहे. भारतीय लवप्रीत सिंह पुरूष १०९ किलो ग्राम वजनी गटात देशासाठी कांस्यपदक पटकावले आहे. लवप्रीतने स्नॅचमध्ये १६३ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १९२ किलो असे एकूण ३५५ किलो वजन उचलून कांस्यपदकावर कब्जा केला. लवप्रीतच्या यशस्वी कामगिरीनंतर भारताची राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेतील पदकसंख्या चौदावर पोहचली आहे.
लवप्रीत सिंहने वेटलिफ्टिंगच्या १०९ किलो ग्राम वजनी गटात चांगली कामगिरी केली. स्नेचमध्ये पहिल्या प्रयत्नात त्याने १५७ किलो वजन उचलले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात १६१ आणि तिसऱ्या प्रयत्नात १६३ किलो वजन उचलले. तसेच क्लीन अँड जर्कमधील पहिल्या प्रयत्नात १८५ किलो ग्राम वजन उचलले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात १८९ आणि तिसऱ्या प्रयत्नात १९२ किलोग्राम उजन उचलले.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं आतापर्यंत १४ पदक जिंकली आहेत. ज्यात पाच सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्यपदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, भारताने सर्वाधिक पदक वेटलिफ्टिंगमध्येच जिंकले आहेत.
सुवर्णपदक- ५
मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ.
रौप्यपदक- ५
संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ.
कांस्यपदक- ४
गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह.