नरेंद्र मोहिते
रत्नागिरी : भातशेती लागवडीच्या कालावधीत चांगल्या प्रकारे पडलेल्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे विश्रांती घेतल्याने जिल्ह्यात लावलेली शेती करपू लागली आहे. त्यामुळे बळीराजा धास्तावला आहे. लावणीच्या अंतिम टप्प्यापासून पाऊस गायब झाल्याने लागवड केलेली भातरोपे करपू लागली आहेत, तर काही ठिकाणी पाण्याअभावी भातशेतीच्या जमिनीला भेगा पडल्या आहेत. तसेच नाचणी, वरी ही वरकस पिकेही लावल्यानंतर पाऊस न झाल्याने रोपे सुकून गेली आहेत. त्यामुळे आता पावसाच्या या लहरीपणामुळे भातशेतीही हातून जाणार काय? याची चिंता बळीराजाला लागली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पार मंडणगडपासून राजापूरपर्यंत मोठ्या प्रमाणावर लावलेली भातशेती पाणी नसल्याने सुकू लागल्याने बळीराजाच्या डोळ्यांत पाणी आले आहे. त्यात वरकस नाचणी, वरी या पिकांनाही याचा फटका बसला आहे. या वर्षी काहीशा उशिराने आगमन झालेल्या मान्सूनने जून आणि जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात धुंवाधार सुरुवात करत शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. उशिरा पण चांगला पाऊस पडू लागल्याने बळीराजा सुखावला होता. त्यामुळे मग जिल्ह्यात भातलागवडीच्या कामांना वेग आला होता. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात सर्वत्र भात लावणीची कामे वगाने सुरू होती. काही ठिकाणी, तर त्यावेळी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने लावलेली शेती पाण्याखालीही गेली होती. त्यामुळे जर असाचा पाऊस पडत राहिला व पूरपरिस्थिती कायम राहिली, तर ही शेती पाण्यात जाते की काय? अशी भीती शेकऱ्यांना होती. मात्र जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाने दडी मारली. पावसाच्या विश्रांतीमुळे सर्वत्र ऊन- पावसाचा लपंडाव सुरू झाला आहे. लावणीच्या अंतिम टप्यात पावसाने दडी मारल्याने अनेक भागात शेतकऱ्यांनी मोटरपंपाच्या सहाय्याने उपलब्ध पाणी खेचून त्या पाण्याने उरली सुरली भातलावणी पूर्ण केली. मात्र त्यानंतर पावसाने पूर्ण दडी मारल्याने पावसाअभावी भात रोपे करपू लागल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र पाहावयास मिळत आहे, तर काही ठिकाणी भातशेतीच्या शेतात तडे गेले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात अगदी मंडणगडपासून राजापूरपर्यंत प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी भातशेती करतात, खास करून खाडी किनारीही मोठ्या प्रमाणावर शेतकरी आपल्या शेतात भात पीक घेतात, या भात लागवडीनंतर पुरेसा पाऊस पडणे आवश्यक असते. मात्र पाऊस गायब होऊन काही भागात कडक ऊन पडू लागल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम भात रोपांवर होत आहे. उन्हामुळे सडे भागातील धुळपेरणीची रोपे करपून गेली आहेत. अशीच पस्थितीत आणखी काही दिवस राहिल्यास भातशेतीच धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे, तर काही ठिकाणी नाचणी व वरीची लावलेली रोपे पाण्याअभावी सुकून गेली आहेत, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांची भातशेतीही लावणे बाकी आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत सध्या बळीराजा आहे.
खरं तर या वर्षी राज्यात पाऊस लवकर येणार, असा अंदाज असतानाही पावसाचे आगमन काहीसे उशिराच झालेले दिसून आले. यामुळे पाण्याची कमतरता काही भागांमध्ये विशेष जाणवली. जून महिना कोरडा गेल्याने सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. तरीही शेतकऱ्यांनी वहाळाचे, नदीचे पाणी मोटरपंपाने लावून लावणी केली. मात्र जुलै महिन्याच्या अखेरच्या दिवसांत पावसाने दडी मारल्याने ऐन मोक्याच्या वेळी शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली.
गेल्या पंधरा दिवसांपासून काही तुरळक सरी वगळता कडक ऊन पडल्याने काही भागांत भात लागवडीमध्ये जमिनीला तडे गेल्याचे व रोपे सुकू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तर भात लागवडीनंतर शेतकरी नागलीच्या शेतीकडे वळतो. मात्र पाऊसच गायब झाल्याने बऱ्याच भागात ही लागवड खोळंबल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला दुहेरी नुकसानीचा सामना करावा लागत आहे. या हंगामात कमी प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. १२ जुलैपासून पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा आलेख खाली आला असल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम भातशेतीवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. गत वर्षी जुलैच्या २० तारेखेपासून सर्वत्र मुसळधार पाऊस झाला होता. त्या पावसाचा जोर अगदी ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत कायम होता. मात्र या वर्षी पावसाची सुरुवातही उशीरा झाली आणि आता शेती लागवडीनंतर पूर्णपणे पाऊस गायब झाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून बदलेल्या वातावरणाचा फटका प्रामुख्याने भातपिकाला बसत आहे. मात्र शेतकऱ्याला शासन स्तरावरून म्हणावा तसा दिलासा मिळत नसल्याने शेतीही बेभरवशाचीच झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पावसाच्या या लपंडावमुळे आता जिल्ह्यातील भातशेतीलाही ग्रहण लागले असून पुढील काही दिवसांत पाऊस झाला नाही, तर जिल्ह्यातील भातशेती पूर्णपणे धोक्यात येणार आहे. शासनाकडून कायमच कोकणातील शेतकऱ्यांवर अन्याय होतो, त्यातच भातशेतीचे प्रमाण कमी होत आहे. तरीही शेतकरी वेगवेगळे प्रयोग करून शेती करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पावसाच्या लहरीपणामुळे भातशेतीसह अन्य नाचणी, वरी पिकांनाही फटका बसत आहे. त्यामुळे आता कोकणातील लोकप्रतिनिधींनी पावसाअभावी करपून गेलेल्या शेतीला आणि डोळ्यांत पाणी आलेल्या शेतकऱ्याला न्याय देणे अपेक्षित आहे.