Monday, July 15, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यविभक्त असलेल्या पालकांची मुलं आणि त्यांच्या समस्या

विभक्त असलेल्या पालकांची मुलं आणि त्यांच्या समस्या

मीनाक्षी जगदाळे

पालकत्व, प्रत्येक-स्त्री पुरुषाच्या आयुष्यातील हवीहवीशी वाटणारी जबाबदारी. लग्न झाल्यावर पती-पत्नीला सर्वोच्च आनंद देणारा प्रसंग म्हणजेच त्यांनी आई-बाबा होणं, बाळाची चाहूल लागली की घरातील प्रत्येक जण त्याच्या आगमनाची तयारी आणि तो आनंद साजरा करण्यासाठी करीत असलेली धावपळ शब्दांत वर्णन करणे शक्य नाही. बाळ जन्माला आल्यापासून आई-बाप म्हणून जे पालकत्व सुरू होतं ते पार आई-वडिलांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहतं. मुलं कितीही मोठी झाली, कमावती झाली, कितीही शिकली, आपल्या मुलांना मुलं झाली तरी सुद्धा आपली पालकत्वाची भूमिका संपत नाही. आई-वडील दोघांनी एकत्र हे पालकत्व जगणे, अनुभवणे, त्याचा आनंद घेणे आणि मुलांना एक ऊबदार सुरक्षित आयुष्य देणे यांसारखे सुख, अभिमान आणि कर्तृत्व कशातच नाही. आपण जन्माला घातलेल्या पाल्याच्या प्रत्येक सुख-दुःखात, आनंदात जे पालक एकत्रित सहभागी होतात त्यांना खरंच नशीबवान म्हणायला हवे.

आजच्या बदलत्या समाजरचनेनुसार, बदलत्या जीवनशैलीनुसार मुलांना, त्याच्या जडणघडणीला महत्त्व देण्यापेक्षा ही, पती-पत्नींनी विभक्त होणे, घटस्फोट घेणे, मतभेद आहेत म्हणून वेगळे राहणे, दोघांनी किंवा दोघांपैकी एकाने दुसरा विवाह करणे, दुसरी रिलेशनशिप स्वीकारणे, लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणे, विवाहबाह्य संबंध ठेवणे अशा नवनवीन संकल्पना आत्मसात करून मुलांवर अन्याय करणे सर्रास सुरू आहे. आपण कोणाचे तरी पालक आहोत आणि त्याप्रति आपली काही कर्तव्य आणि काही जबाबदाऱ्या आहेत याचा सोयीस्कर विसर आई-वडिलांना पडत चाललेला आहे. मुलबाळं झाली. आपल्या वंशाला दिवा किंवा पणती मिळाली. आता ते होतील आपोआप मोठे, स्वीकारतील परिस्थिती, जातील सामोरे सगळ्यांना असं पालक गृहीत धरतात. निसर्ग नियमानुसार वाढतील मुलं आज-काल मुलांना सगळं समजतं त्यामुळे आपण आपलं आयुष्य कसही जागा मुलांचा विचार तितकासा महत्त्वाचा नाही हीच बहुतांशी पालकांची मनोधारणा असते.

पती-पत्नीमध्ये भांडण आहे, त्यांचं एकमेकांशी पटत नाही, त्यांना एकत्र राहायचं नाही, त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्या मनाप्रमाणे जगायचं आहे, त्याला कोणा वेगळ्या व्यक्तीसोबत राहण्यात जास्त रुची आहे, त्यासाठी संसाराला मुला-बाळांना सोडायला देखील आणि तोडायला देखील आई-बाप तयार असतात. एकटीच पत्नी अथवा पती सुद्धा मुलांची आर्थिक, भावनिक आणि मानसिक जबाबदारी कशी झटकता येईल यावर भर देतात. स्वीकारलीच जबाबदारी तर ती फक्त आर्थिक असते आणि तेही कर्तव्य म्हणून केलेली असते.

आपल्या चुकांचा जगावेगळ्या निर्णयांचा, समाज प्रवाहाच्या विरुद्ध वागण्याचा आपल्या पाल्यांवर काय परिणाम होणार आहे याचा थोडाही विचार अथवा खंत पती- पत्नीमध्ये पाहायला मिळत नाही. अशा परिस्थितीत मुलं वरून कितीही शारीरिक दृष्टीने जरी सुदृढ दिसत असली, अभ्यासात हुशार असली तरी त्यांची मानसिकता किती पोखरलेली असते, त्यांच्या भावभावना किती कोलमडलेल्या असतात हे आपण पाहत नाही.

आपल्या मुलांनी देखील आपण ज्या चुका केल्यात त्या स्वीकाराव्यात, आपले सर्व चुकीचे निर्णय देखील त्यांनी भोगावेत आणि आपल्याला वेगळे होण्यामुळे त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेल्या त्रासाला त्यांनी सामोरे जावे आणि हे सर्व करून पण परत मुलांनी आई-वडील दोघांचा आदर करावा, म्हातारपणी त्यांना सांभाळावे, त्यांची बाजू ऐकून घ्यावी यांसारख्या भरमसाट अपेक्षा मुलांकडून ठेवल्या जातात. आपण आपल्या मुलांना लहानपणापासून काय दिलं यापेक्षा त्यांनी म्हातारपणी आपल्याला काय द्यावे हे आपणच ठरवत असतो.

पती-पत्नी मुलांसोबत किती काळ एकत्र राहिलीत, मुलं किती वर्षांची असताना ते वेगळे झालेत, का झालेत, कोण चुकलं, कोण बरोबर होतं, काय घडलं याबाबत मुलं मोठी होईपर्यंत अनेक तर्कवितर्क लावून असतात. त्यांना अनेकांकडून अनेक कहाण्या देखील ऐकायला मिळालेल्या असतात. प्रत्येक मुलं स्वतःच्या बौद्धिक, मानसिक कुवतीनुसार या सगळ्या परिस्थितीचा कसा आणि काय विचार करतोय हे कोणीही सांगू शकत नाही.

विभक्त असलेल्या पालकांच्या मुलांचं शालेय, महाविद्यालयीन, सामाजिक आयुष्य किती संघर्षमय असू शकतं, किती प्रश्नांना त्यांना उत्तर द्यावी लागू शकतात, अवहेलना, अपमान त्यांच्या वाट्याला येते याबाबत विचार न केलेलाच बरा. आपल्या बरोबरीचे मित्र त्याच नॉर्मल आयुष्य, आपले शेजारी असलेले मित्र त्यांचं सुरळीत आयुष्य पाहून अशी मुलं मनोमन किती एकटी पडतात, हे देखील त्याच्या वैयक्तिक विचारसरणीवर अवलंबून आहे.

मुलांना आई-वडील सारखेच प्रिय असतात आणि दोघांचाही सहवास, मार्गदर्शन, सोबत त्यांना वेळोवेळी हवी असते. पण आपल्या खोट्या अहंकारात आणि चुकीच्या निर्णयात पालक इतके मश्गुल असतात की, आपण आपल्या पोटच्या मुलांवर काय आणि किती अन्याय करतोय, त्याच्यावर या परिस्थितीचा काय परिणाम होतोय हे त्यांच्या खिजगणतीत पण नसते.

अनेक पालक असे आहेत. जे केवळ मुलांना जन्म देतात पण पुढील सर्व जबाबदारी फक्त एकजण निभावतो. आपापसात पटत नाही म्हणून पती-पत्नी कोर्ट-कचेरीच्या फेऱ्यात स्वतःला अडकवून घेतात आणि मुलं तुझं की माझं, कोणाकडे राहील, खर्च कोण करेल, खर्च वाटून करायचा का, त्यांच्यावर हक्क कोणाचा, तो आई किंवा वडिलांना कोर्टात भेटेल की बाहेर भेटेल, त्यासाठी परवानगी, ताबा या विषयावर मुलांबद्दल बोली लावायला लागतात. आपला खोटा स्वाभिमान, अहंकार, आपला हट्ट, आपली बेताल वागणूक मुलांचे आयुष्य किती बरबाद करू शकते याची असंख्य उदाहरणं समाजात आहेत.

विभक्त आई-वडिलांच्या मुलांचे यश, अपयश, त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग हा जणू एक स्फोटक विषय असतो. पती-पत्नींना एकमेकांना हिणवायला, कमी दाखवायला. यामध्ये खतपाणी घालायला असतात, अगदीच जवळचे नातेवाईक.

एकूणच मुलांचं रंग, रूप, सवयी, व्यक्तिमत्त्व, स्वभाव हा आई-वडील दोघांच्याही जीवशास्त्रीय गुणसूत्रांच्या आधारे विकसित झालेला असतो. मग त्या मुलाच्या चांगल्या-वाईट वागणुकीला आई किंवा वडील कोणीही एकच जण जबाबदार कसा असेल? मुळात हे मूल ज्या दोघांची नैसर्गिक निर्मिती आहे त्या दोघांचेच गुणधर्म त्याच्यात असतील, तर इथे इतरांनी त्या मुलांचं मूल्यांकन करणं कितपत योग्य आहे? ज्या पती-पत्नीच्या एकत्र येण्यातून मूल जन्माला आलं आहे त्याने त्यांच्या मूर्खपणामुळे इतरांना तोंड का द्यावं आणि का स्वतःच आयुष्य फक्त तडजोड करीत जगावं यावर विचार होणे क्रमप्राप्त आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -