Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीराजकीय

शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही- उदय सामंत

शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही- उदय सामंत

मुंबई : पुण्यातल्या कात्रजमध्ये शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी हल्ला करण्यात आला. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिराच्या दिशेने ते जात असताना शिवसैनिकांकडून हा हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या घटनेत सामंत यांच्या गाडीतील एक जण जखमी झाला असून उदय सामंत मात्र सुरक्षित आहेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता तरी आम्ही शांत असून, आता मात्र आमचा अंत पाहू नका" असा इशारा सामंतांनी शिवसेनेला दिला आहे.


मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असताना ते पुण्यातील दगडुशेठ गणपतीचे दर्शन घेणार होते. यासाठी उदय सामंत हे देखील दगडुशेठच्या दिशेने जात होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या समर्थकांनी सामंतांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात गाडीतील एक जण जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर सामंत यांनी ट्विट करुन या हल्लाबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.


ते म्हणाले की, "गद्दार म्हणता तरी शांत आहे...शिव्या घालता तरी शांत आहे..आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे.. लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल.. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही..काळ ह्याला उत्तर आहे..अंत पाहू नका.. जय महाराष्ट्र"


दुसऱ्या एका ट्विटमध्ये सामंत यांनी म्हटले आहे की, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुणे दौऱ्यात असताना माझ्यावर काही व्यक्तींकडून भ्याड हल्ला करण्यात आला. वैचारिक मतभेत असू शकतात मात्र,अशाप्रकारे हल्ले करणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती-संस्कार नाही. अशा भ्याड हल्ल्याला मी भीक घालत नाही आणि मी थांबणार ही नाही.


गाडीवर दगड मारुन पळून जाणे ही मर्दानगी नाही. कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्याचे काम सरकारचे आणि पोलिसांचे आहे. त्यामुळे ज्यांनी हे केले त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम पोलिस करतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Comments
Add Comment