मुंबई : कांद्याच्या दरामध्ये घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटनांकडून नाराजीचा तसेच संतापाचा सूर आळविला जात आहे. नाशिकमधील शेतकरी संघटनांनी कांदा विक्री थांबविण्याचा इशाराही दिला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील कांदा बटाटा मार्केटमधील गाळ्यामध्ये जावून पाहणी केल्यावर तसेच कांदा विक्रेत्या व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यावर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून विक्रीसाठी खराब कांदा येत असताना चांगला दर मिळणार कसा? असा प्रश्न व्यापाऱ्यांनी व व्यापाऱ्यांच्या गाळ्यावर विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून विचारण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील नाशिक, नगर आणि पुणे याच तीन जिल्ह्यातून प्रामुख्याने बाराही महिने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी येत असतो. आजही मार्केटमध्ये ग्रामीण भागातून सरासरी दररोज ९० ते ११० ट्रकमधून कांदा विक्रीसाठी येत आहे. विक्रीसाठी येणाऱ्या कांद्यामध्ये जेमतेम २० टक्के कांदा चांगल्या दर्जाचा असून उर्वरित ८० टक्के कांदा चांगल्या प्रतीचा नसतो. बाजारात विक्रीसाठी येणारा कांदा हा उन्हाळी कांदा असून शेतकरी आपल्या चाळीमधील काही कांदा विक्रीसाठी मार्केटमध्ये पाठवित आहे. चांगला बाजारभाव मिळण्याच्या आशावादावर आजही शेतकऱ्यांच्या चाळीमध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर साठवणूक करुन ठेवलेला पहावयास मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून चाळीमध्ये ठेवण्यात आलेल्या कांद्याची वेळोवेळी छाननी करून खराब होवू पाहणारा कांदा शेतकरी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवत आहेत. चांगला कांदा पुन्हा चाळीमध्ये पाठविला जात आहे. डिसेंबर, जानेवारी लागवड झालेला कांदा एप्रिल-मेमध्ये शेतकरी शेतातून काढत असतो. त्याचवेळी पाऊसाचे आगमन पाहून दरवर्षी ऑगस्टच्या अखेरीस व सप्टेंबरच्या मध्यावर कांदा दरात होणाऱ्या महागाईचे गणित साध्य करण्यासाठी नवीन कांदा चाळीमध्ये साठवणूकीसाठी पाठविला जातो. हा कांदा टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविला जातो.
नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात पावसाचे गणित पाहून आताही गेल्या महिन्याभरात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करण्यात आलेली आहे. हा कांदा साधारणपणे ऑक्टोबरमध्ये शेतातून काढला जाईल. सध्या ग्रामीण भागातील बाजार समित्यांमधून ६ ते ८ रूपये किलो दराने कांदा खरेदी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी करत असून तो कांदा नवी मुंबईतील तुर्भेस्थित कांदा बटाटा मार्केटमध्ये वाहतुक, माथाडी व अन्य खर्च जमेस धरून हा कांदा १२ ते १४ रूपये दराने विकला जात आहे. मात्र स्थानिक किरकोळ बाजारांमध्ये हाच कांदा १८ ते २० रूपये किलो दराने विकला जात आहे.
ऑगस्ट अखेरीपासून ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यत कांद्यांचे दर वाढण्यास सुरु होते. त्यानंतर नोव्हेंबरच्या मध्यापासून नगर, नाशिक, पुणे जिल्ह्यातून पावसाळी कांदा मोठ्या प्रमाणावर मार्केटमध्ये विक्रीला येत असून त्यानंतर पुन्हा कांद्याच्या दरामध्ये घसरण होण्यास सुरूवात होते. सध्या मार्केटमध्ये येणाऱ्या २० टक्के चांगल्या कांद्याची खरेदी स्थानिक बाजारामध्ये गृहीणींकडून खरेदी केला जात असून उर्वरित ८० टक्के चांगल्या प्रतीचा नसणारा कांदा मुंबई शहरातील, उपनगरातील, नवी मुंबई, ठाण्यातील हॉटेलचालक स्वस्त दरात मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असतात. चांगल्या दर्जाचा नसणारा कांदा हॉटेलचालकांना स्वस्त दरात प्राप्त होत असतो. शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचा चाळीमध्ये ठेवलेला कांदा विक्रीसाठी पाठविल्यास त्यांना नक्कीच चांगला बाजारभाव प्राप्त होईल, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी कांदा विक्रीला कधी पाठवायचा हा पूर्णपणे शेतकऱ्यांचा निर्णय आहे. ते कांदा उत्पादक पर्यायाने कांदा पिकाचे मालक आहे. चाळीमध्ये कांदा साठवणूक करणे पूर्णपणे कायदेशीर असून चाळींसाठी शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदानही देण्यात येत असते. परंतु मार्केटमध्ये विक्रीसाठी चांगला कांदा पाठविल्यास त्यांना नक्कीच चांगले बाजारभाव प्राप्त होतील. तालुकास्तरीय बाजार समितीमधील दर व किरकोळ बाजारातील दर यात फरक हा वर्षानुवर्षे कायम राहीला आहे. ग्रामीण बाजारपेठांतून शहरात कांदा विक्रीसाठी आणताना वाहतुक खर्च, माथाडी व अन्य खर्च गृहीत धरूनच दरामध्ये फरक हा होत असतो. – अशोक वाळूंज संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबई