Friday, January 17, 2025
Homeमहाराष्ट्रशालेय पोषण आहार वाटपापूर्वी अंगणवाडी शाळांची तपासणी करण्यात येणार

शालेय पोषण आहार वाटपापूर्वी अंगणवाडी शाळांची तपासणी करण्यात येणार

नाशिक (प्रतिनिधी ): शालेय पोषण आहार वाटपापूर्वी अंगणवाडी शाळांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच अंगणवाड्यांना पोषण आहाराचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर यांनी दिली.

महापालिकेच्या पंचवटी विभागातील आठ अंगणवाडी शाळांची तपासणी समाज कल्याण उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर यांनी केली. लवकरच सगळया अंगणवाडी शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचे वाटप केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अशी पाहणी केली जात आहे. नांदूर, मानुर, आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद भागातील अंगणवाडींना भेट देऊन मुलांची पटसंख्या, हजेरी याबाबत त्यांनी खात्री केली. तेथील स्वच्छतागृह, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था अशा मूलभूत सोयी सुविधा जाणून घेतल्या. शाळांमधील वैद्यकीय आणि पोषण आहाराच्या व्यवस्थेबाबत चौकशी केली.

अंगणवाडीसाठी स्वतःची इमारत उपलब्ध असल्याबाबतही चौकशी केली. इमारत नसलेल्या अंगणवाड्यांना प्राधान्याने इमारत उपलब्ध करून देण्याबाबत उपायुक्तांनी यावेळी आश्वासित केले. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व अंगणवाड्यांची तपासणी केली जात आहे. त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या जात असल्याचे डॉ. मेनकर यांनी यावेळी सांगितले. या भेटीच्यावेळी विभागीय अधिकारी कैलाश रबदिया, मुख्य सेविका श्रीमती गायकवाड उपस्थित होत्या.

अंगणवाडीमधील सरासरी हजेरी

नांदूर- ६० विद्यार्थी
मानूर- २२ ते २६ विद्यार्थी
आडगाव (शाळा क्रमांक २२)- ३०विद्यार्थी
आडगाव (शाळा क्रमांक २३ )- २६ विद्यार्थी
आडगाव (शाळा क्रमांक २५)- २७ विद्यार्थी
आडगाव वसंतदादा नगर (शाळा क्रमांक २१)- ३० विद्यार्थी
म्हसरुळ-(शाळा क्रमांक ३६)- ३२ विद्यार्थी
म्हसरुळ-(शाळा क्रमांक ३७)- २८ विद्यार्थी

मुलांची वैद्यकीय तपासणीही होणार

महापालिका क्षेत्रात एकूण ३५४ अंगणवाडी शाळा आहेत. नुकतीच नाशिक रोड विभागातीलही ११ अंगणवाडी शाळांची तपासणी करण्यात आली होती. शाळांमधील सुविधा, पटसंख्या, पटसंख्येनुसार हजेरी याची तपासणी करण्यात येत आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांशीही अधिकारी संवाद साधत आहेत. कुपोषित बालकांचे निदान होण्यासाठी दर तीन महिन्यांनी अंगणवाडीतील मुलांची वैद्यकीय तपासणी देखील होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -