वॉशिंग्टन : अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरीला अमेरिकेने रविवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात अफगाणिस्तानामध्ये ठार केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही याला दुजोरा दिला होता. ही कारवाई म्हणजे ९/११ च्या हल्ल्याचा बदला असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र आता अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतर अमेरिकेला एका नव्या भीतीने ग्रासले असून, अमेरिकेने जगभरातील आपल्या नागरिकांना अलर्ट जारी करत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतर अल-कायदाशी संबंधित दहशतवादी संघटना अमेरिकेची कार्यालये आणि जवानांना लक्ष्य करू शकतात, त्यामुळे सर्वांनी सतर्क राहावे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जगभरातील आपल्या नागरिकांना अलर्ट जारी करत म्हटले आहे. रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल-जवाहिरी मारला गेला. २०११ मध्ये ओसामा बिन लादेन मारला गेल्यानंतर अल कायदाचे नेतृत्व जवाहिरी करत होता. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत झालेल्या हल्ल्यामागे अल जवाहिरीची महत्त्वाची भूमिका असल्याचेही सांगण्यात येत आहे.