Wednesday, April 30, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

राज्यात २२५३ स्कूल बसवर कारवाई

मुंबई : अधिकृत स्कूल बस विशेष तपासणी मोहिमेत राज्यात एकूण १६६१ परवानाधारक वाहने व ५९२ विनापरवानाधारक वाहने अशा एकूण २२५३ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ५४ लाख ६६ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे.

परिवहन विभागाच्या वतीने २६ जुलै २०२२ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत अनधिकृत स्कूल बस यांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत परवाना नसलेली वाहने, स्पीड गव्हर्नर नसलेली वाहने, वैध विमा प्रमाणपत्र नसलेली वाहने, अग्निशमन सुविधा नसलेली वाहने, स्कूल बस नियमावलीतील इतर तरतुदींचा भंग वाहने अशा नियमांना पायदळी तुडविणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. परिवहन विभागातर्फे पालकांना आवाहन करण्यात आले की, त्यांनी आपला पाल्य ज्या बसमधून किंवा व्हॅनमधून शाळेत जातो, त्या बस अथवा व्हॅनचा चालक/मालक व त्या वाहनाची माहिती ठेवावी.

काही शंका आल्यास त्याबाबत आपण नजीकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून शंका निरसन करून घ्यावी. तसेच ज्या शाळांमध्ये मुले व्हॅनद्वारे अथवा स्कूल बसने येतात, त्या शाळांनीही व्हॅनबद्दल माहीती ठेवावी, असे आवाहन राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

Comments
Add Comment