
मुंबई (प्रतिनिधी) : विना तिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी केली जाते. एप्रिल ते जुलै २०२२ या चार महिन्यांत फुकट्या प्रवाशांकडून १२६.१८ कोटी रुपयांची वसूली केली आहे.
मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने एप्रिल-जुलै २०२२ या पहिल्या चार महिन्यांत १२६.१८ कोटी रुपयांचा विक्रमी तिकीट तपासणी महसूल जमा केला आहे. जुलै २०२२ या महिन्यात, मध्य रेल्वेने बुक न केलेल्या सामानासह विनातिकीट/अनियमित प्रवासाच्या ३.२७ लाख प्रकरणांद्वारे २०.६६ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे.
एप्रिल ते जुलै २०२२ या महिन्यात, विनातिकीट/अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण १८.३७ लाख प्रकरणे आढळून आली आहेत. मागील वर्षी याच कालावधीत ७.४९ लाख प्रकरणे आढळून आली असून त्यात १४५.१७ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. अशा विनातिकीट/अनियमित प्रवासातून प्राप्त झालेल्या महसुलात म्हणजेच एप्रिल ते जुलै २०२२ साठी रु.१२६.१८ कोटी नोंदवले गेले आहेत. जे मागील वर्षीच्या याच कालावधीत नोंदवलेल्या ४५ कोटी रुपये महसुलाच्या तुलनेत १८० टक्क्यांची वाढ झाली आहे.