मुंबई : धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यावर बलात्कार पीडीतेला धमकावल्याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. केदार दिघेंना नुकतीच उद्धव ठाकरे यांनी ठाण्याच्या जिल्हाप्रमुख पदाची मोठी जबाबदारी दिली आहे. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा नवे ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.
मिळालेली सविस्तर माहिती अशी की, केदार दिघे यांचे मित्र आणि मुख्य संशयित आरोपी रोहित कपूर याने २८ जुलै रोजी लोअर परेळ येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. कपूर याने धनादेश देण्यासाठी पीडितेला हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित तरुणीने याबाबत तक्रार करू नये, म्हणून केदार दिघे यांनी तिला धमकावल्याचा पीडितेचा आरोप आहे.
तक्रारदार २३ वर्षीय महिला खाजगी कंपनीत क्लब अॅम्बेसिटर असुन रेजीस हॉटेल, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई मध्ये येणाऱ्या गेस्टना अटेन्ड करून क्लब मेरेट मेम्बरशीपबाबत माहिती देण्याचे काम करतात. २८ जुलैला तक्रारदार महिलेस संशयित आरोपी रोहित कपुर याने क्लब मेरेट मेम्बरशीप घेतो असे सांगून तिला सेंट रेजीस हॉटेलमध्ये जेवणासाठी बोलावले. ही महिला त्या खोलीत गेली असता तिच्यावर रोहित कपूर याने लैंगिक अत्याचार केला. या महिलेने याबाबत आधी कोठेही वाच्यता केली नाही. परंतु, ३१ जुलैला महिलेने ही बाब मित्रांना सांगितली. नंतर तिने रोहित कपुर यास व्हॉट्सअपद्वारे मॅसेज करून जाबही विचारला पण त्याने तिचे व्हॉट्सअप ब्लॉक केले.
१ ऑगस्टला तक्रारदार महिलेला रोहित कपुर याने त्याचा मित्र आरोपी केदार दिघे यांच्या मध्यस्थीने पैसे घेऊन या घटनेबाबत कोणालाही वाच्यता न करणेबाबत सांगितले पण तक्रारदार महिलेने या प्रस्तावाला धुडकावत ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात रोहित कपूर व केदार दिघे यांच्या विरुद्ध तक्रार दिली.
ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी केदार दिघे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ तसेच मित्र रोहित कपूर याच्याविरोधात कलम ३७६ नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरुणीने गुन्हा दाखल करण्यासाठी सोमवारी पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा इशारा नाही शिवसैनिकांच्या मनातील संताप आहे! ठाणे हा शिवसेना आणि आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. जर जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकांना सत्तेचा वापर करून स्वार्थासाठी चुकीची कारवाई कराल,दबाव टाकाल तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरावर शिवसैनिकांना सोबत घेऊन मोर्चा काढावा लागेल! या इशाऱ्यानंतर केदार दिघे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धर्मवीर आनंद दिघे यांचे आपण शिष्य आहोत असे म्हणत राज्यातील राजकारणाला त्यांच्याच विचारांची दिशा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आनंद दिघेंचेचे पुतणे केदार दिघे हे उद्धव ठाकरेंकडे उरलेला सर्वात सक्षम पर्याय आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या वाटचालीला थोडीफार खीळ बसू शकते त्यामुळेच आता केदार दिघेंच्या मार्गात काटे आल्याचे सांगण्यात आले आहे. दाखल झालेल्या गुन्ह्याने कोणत्याही क्षणी केदार दिघे यांच्यावरती कारवाईची शक्यता आहे.