विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेने दहीहंडी या साहसी खेळातील जोखीम लक्षात घेऊन गोविंदा पथकांसाठी अपघाती विमा जाहीर केला आहे. अपघाती विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त गोविंदांनी घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
कोविड-१९ संक्रमण काळानंतर आता सर्वच सणांच्या तयारीला उत्साह आला आहे. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने गोविंदा पथकेही सरावाला लागली आहेत. दहीहंडीचा उत्साह मोठा असला तरी हा साहसी खेळ असल्याने त्यात जोखीमही तितकीच आहे. या खेळात सात ते आठ थर लावले जात असल्याने अनेकदा हंडी फोडण्याच्या प्रयत्नात गोविंदा जखमी होतात. अनेकदा त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते. या सगळ्यात त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसतो.
हे सर्व गोविंदा सामान्य घरातून असल्याने हा खर्च त्यांच्या आवाक्यापलीकडे असतो. अशावेळी ‘विमा कवच’ असल्यास या गोविंदांना मोठा दिलासा मिळतो. हीच गरज लक्षात घेऊन वसई-विरार महापालिकेने गोविंदा पथकांकरता अपघाती विमा जाहीर केला आहे. पालिकेच्या माध्यमातून देण्यात येणारा हा विमा मोफत असणार आहे.
या करता नोंदणीकृत गोविंदा पथकांना आपल्या माहितीचा अर्ज पालिकेत भरून द्यायचा आहे. ज्या दिवशी विम्याची नोंदणी होईल त्या दिवशीपासून दहीहंडी उत्सवाच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत हा विमा लागू असणार आहे. याकरता गोविंदा पथकांना आपली संपूर्ण माहिती विमा कंपनीला द्यावी लागणार आहे. न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीकडून गोंविदा पथकांना विमा काढून दिला जाणार आहे.
वसई-विरार महापालिका क्षेत्रात ७७ पेक्षा अधिक नोंदणीकृत गोविंदा पथके आहेत. २०१९ मध्ये ४ हजार ६७५ गोविंदांनी पालिकेच्या विमा योजनेचा लाभ घेतला होता. या विम्याची एकूण रक्कम ३ लाख ४९ हजार २७५ इतकी होती. या वर्षी या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता पालिकेने व्यक्त केली आहे.