रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी-सिंधुदुर्गसह राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांमध्ये विकासात्मक आणि संघटनात्मक ढाचा मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकसभा प्रवास योजनेचे नियोजन करण्यात आले असून रत्नागिरीमध्ये येत्या ७ ऑगस्टपासून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार यांचा तीन दिवसांचा दौरा होणार आहे. या ३ दिवसांमध्ये या मतदारसंघातील संघटनात्मक, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक अंगांना स्पर्श करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ८ वर्षांच्या कार्यकाळातील विकासात्मक कामांचा आढावासुद्धा घेतला जाणार आहे अशी माहिती राज्याचे माजी मंत्री व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा भाजप सचिव निलेश राणे, लोकसभा प्रवास योजनेतील चार मतदारसंघांचे प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार, भाजपचे रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, बाळ माने आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. लोकसभा प्रवास योजनेची माहिती देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांमध्ये ही योजना १८ महिने सुरू राहणार आहे. या १८ महिन्यात ६ वेळा केंद्रीय मंत्री त्यांना नेमून दिलेल्या मतदारसंघात येणार असून सलग तीन दिवस मतदारसंघांमध्ये मुक्काम करणार आहेत. म्हणजेच केंद्रीय मंत्री या १८ महिन्यात १८ दिवस त्यांना नेमून दिलेल्या मतदारसंघात राहून इथल्या स्थानिक मतदार, कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
मतदारसंघातील संघटनात्मक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्राशी निगडीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षांच्या कालावधीत मतदारसंघातील विकासकामांचा आढावासुद्धा या दिवशी घेण्यात येणार आहे. त्याच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन सुद्धा करण्यात येणार आहे. त्याशिवाय बूथ कार्यकर्त्यांशी, लाभार्थ्यांशी संवाद, मतदारसंघातील स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभागी झालेल्या लोकांची भेट घेतली जाणार आहे. रत्नागिरीमध्ये ७ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट या तीन दिवसांमध्ये येणाऱ्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार यांच्या दौऱ्यात असेच कार्यक्रम होणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. भविष्यामध्ये एनडीए म्हणून निवडणूक लढवताना जागावाटपात यातील काही जागा गेल्या तरीसुद्धा सहयोगी पक्षाच्या पाठीशी त्या ठिकाणी भाजपा भक्कमपणे उभा राहील, अशी ग्वाहीसुद्धा या वेळेला बावनकुळे यांनी दिली. याच लोकसभा प्रवासी योजनेच्या माध्यमातून केंद्रामध्ये स्थानिक प्रशासनाने केंद्रातील योजना मतदार संघात राबविल्या, त्याचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचला का? याचा आढावा सुद्धा प्रशासकीय पातळीवर घेतला जाणार आहे. त्यातूनच मतदारसंघामध्ये संघटनात्मक आणि विकासात्मक ग्रहाच्या मजबूत होण्यासाठी उपयोग होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राजापुरातील प्रस्तावित रिफायनरीचा प्रश्न सुद्धा याच प्रवास योजनेच्या माध्यमातून सोडवला जाईल असंही ते म्हणाले. गेल्या अडीच वर्षात राज्यात असलेल्या महाविकास आघाडीने त्यांच्या कार्यकाळातील पहिल्या ३२ दिवसांमध्ये शून्य काम केलं होतं. मात्र नव्याने आलेल्या शिंदे फडणवीस युती सरकारने ३२ दिवसांत सर्वसामान्य लोकांना आवश्यक असलेले ३२ चांगले निर्णय घेऊन आपल्या कामाचा धडाका दाखवला आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा होईल आणि सध्याची ही २०-२०ची मॅच सुरू असून उरलेले अडीच वर्षांमध्ये हे सरकार इतकं चांगलं काम करेल की महाविकास आघाडीच्या आमदारांना पुन्हा आपल्या मतदारसंघांमध्ये स्थानिक जनता उभं करणार नाही, असा टोलासुद्धा बावनकुळे यांनी लगावला.
… तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीत!
महाविकास आघाडी सरकारने २०२१ च्या जनगणनेचा वापर न करताच बेकायदेशीररीत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगर पालिका, नगर पालिकांमधील जागा वाढवल्या आहेत. मात्र याविरोधात आम्ही गेलो असून निकाल आमच्या बाजूने लागला, तर वाढीव जागा रद्द होण्याची शक्यता असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.