नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानी दिल्लीतील विमानतळावर निष्काळजीपणाचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. मंगळवारी इंडिगो विमानाच्या चाकाखाली एक कार आली आणि विमानाच्या चाकाला आदळली. सुदैवाने मोठा अपघात टळला. मंगळवारी दिल्ली विमानतळावर हा अपघात झाला. ही कार गो फर्स्ट एअरलाइनची होती.
मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या टी२ टर्मिनलच्या स्टँड क्रमांक २०१ वर हा अपघात झाला. येथे गो फर्स्ट एअरलाइन कार इंडिगोच्या ए३२०निवो विमानाच्या चाकाखाली आली. आता डीजीसीए या प्रकरणाची चौकशी करणार आहे. दरम्यान, या अपघातानंतर कार चालकाची ब्रेथ अॅनालायझर चाचणी करण्यात आली. पण, तो दारू प्यायलेला नसल्याचे चाचणीतून समोर आले.
सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. तसेच विमानाचे कोणतेही नुकसान झाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी इंडिगोचे हे विमान पाटण्याला जाणार होते. तेवढ्यात ही कार चाकाखाली आली. या प्रकरणी गो फर्स्ट आणि इंडिगोकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.