ठाणे (प्रतिनिधी) : कोरोनानंतर आता स्वाईन फ्ल्यूचे सावट अधिक गडद होताना दिसत आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरात स्वाईन फ्ल्यूचा प्रसार मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्यात जिल्ह्यात एकूण १२६ नव्याने रूग्ण आढळले असून त्यापैकी ३६ रूग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. सध्याच्या घडीला ८५ रूग्ण सक्रीय असून स्वाईन फ्ल्यूमुळे जिल्ह्यात मृतांची संख्या चारवर पोहचली आहे.
ठाणे जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून स्वाईन फ्लूचा प्रादूर्भाव वाढू लागला आहे. जिल्ह्यात रविवारी दिवसभरात १२ नवे स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून असून हे सर्वच पालिका क्षेत्रातील असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या १२६ वर पोहचली आहे. यापैकी सद्यस्थितीला ८५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, उर्वरित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत चार रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यामध्ये तीन रुग्ण हे ठाणे शहरातील आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रापाठोपाठ कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण आहेत. कल्याण-डोंबिवली शहरात रविवारी एकही रुग्ण आढळून आला नसून २३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
नवी मुंबई शहरातही स्वाईन फ्लूचा प्रादूर्भाव
ठाणे, कल्याण-डोंबिवली पाठोपाठ नवी मुंबई शहरातही स्वाईन फ्लूचा प्रादूर्भाव वाढू लागला आहे. नवी मुंबईत शनिवारपर्यंत सहा रुग्ण आढळून आले आहेत, तर, नऊ रुग्णांवर उपचार सुरु होते. मीरा-भाईंदर शहरात एका रुग्णांची नोंद करण्यात आली असून सध्या या शहरात दोन रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात रुग्ण संख्येत होणारी वाढ तसेच मृत्युची वाढती संख्या यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे.