Friday, May 9, 2025

क्रीडा

ज्युदोमध्ये सुशीला देवीला रौप्य

ज्युदोमध्ये सुशीला देवीला रौप्य

बर्मिंगहॅम (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याची भारताची मालिका कायम आहे. ज्युदोमध्ये सुशीला देवीने सोमवारी ४८ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले, तर विजय यादवने पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात कांस्य पदकाला गवसणी घातली. वेटलिफ्टर हजरिंदर कौरने महिलांच्या ७१ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले.


ज्युदोपटू सुशीला देवीला ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे सुशीलाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. विजय यादवने पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात सायप्रसच्या पेट्रोस क्रिस्टोडोलिडसचा पराभव करत कांस्यपदक जिंकले.


रात्री उशिरा वेटलिफ्टर हजरिंदर कौरने महिलांच्या ७१ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. तिने स्नॅच फेरीमध्ये ९३ किलो आणि क्लीन अँड जर्क फेरीमध्ये ११९ किलो वजन उचलले. तिने एकूण २१२ किलो वजनासह तिसरे स्थान पटकावले.


दुसरीकडे पुरुष हॉकीमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात आलेला सामना ४-४ असा बरोबरीत सुटला. भारताने ३-१ अशी आघाडी घेतली. यानंतर इंग्लंडने जोरदार पुनरागमन करत बरोबरी साधली. भारताकडून मनदीप सिंगने दोन गोल केले असून ललित उपाध्याय आणि हरमनप्रीत सिंगने प्रत्येकी १ गोल केला आहे.

Comments
Add Comment