मुंबई (प्रतिनिधी) : देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. अमृत महोत्सवी वर्षात बेस्ट उपक्रमाने केवळ एका रुपयांत बेस्ट आजादी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत चलो अॅपचा पहिल्यांदा वापर करणाऱ्या नव्या प्रवाशांना सात दिवसांचा बसपास केवळ एक रुपयांत डाउनलोड करता येणार आहे. त्यामध्ये त्यांना वातानुकूलित किंवा विना वातानुकूलित बसमध्ये सात दिवसांत कितीही अंतराच्या पाच फेऱ्यांचा समावेश असेल. ही सवलत दिनांक १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत लागू राहणार आहे.
दरम्यान बेस्टच्या डिजिटायझेशनचा भाग म्हणून काही महिन्यांपूर्वीच बेस्ट उपक्रमामध्ये डिजिटल तिकीट प्रणाली सुरू केली होती. सध्या बेस्टच्या ३३ लाख दैनंदिन प्रवाशांपैकी २२ लाख प्रवासी चलो अॅपचा वापर करतात. ३.५ लाख प्रवासी डिजिटल तिकीट प्रणालीचा वापर करतात. दरम्यान बेस्टच्या डिजिटायनेशनला चालना देण्यासाठी बेस्टने ही घोषणा केली आहे.
दरम्यान या योजनेचा भाग म्हणून ज्या लोकांना स्मार्ट कार्डस एनसीएमसी कार्डचा वापर करावयाचा असेल अशा प्रवाशांना २० रुपयांची सवलत दिली जाते. ही सवलत देखील दिनांक १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत लागू राहणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त मुंबईकर प्रवाशांनी घ्यावा असे बेस्ट उपक्रमाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.