Saturday, April 19, 2025
Homeमहत्वाची बातमीनागपुरात अमली पदार्थांच्या विरोधात लढणार 'पोलीस काका'

नागपुरात अमली पदार्थांच्या विरोधात लढणार ‘पोलीस काका’

तरुणाईमध्ये अमली पदार्थाचा वापर रोखण्याकरता पोलिसांचा अभिनव उपक्रम

नागपूर : अमली पदार्थांचा वाढता वापर लक्षात घेऊन तरुणाईला जागृत करत अमली पदार्थांचा वापरावरच घाला घालण्याचे नागपूर पोलिसांनी ठरवले आहे. त्यासाठी “पोलीस काका” ही नवी मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशन मधून चार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालय, तरुणांचे संघटन तसेच गणेशोत्सव आणि नवरात्र मंडळ यांना संपर्क साधून अमली पदार्था विरोधात जागृती करतील.

शाळकरी मुले किंवा महाविद्यालयीन तरुण फक्त स्टेटस म्हणून किंवा मित्रांसमोर आपला बडेजाव दाखवण्यासाठी धुम्रपान किंवा कुठल्या तरी स्वस्त अमली पदार्थांचा वापर सुरु करतात. मात्र, भविष्यात या अमली पदार्थाची सवय त्यांच्याच आरोग्यावर काय दुष्परिणाम घडवेल याची जाणीव त्यांना नसते. म्हणजेच अमली पदार्थांची सवय दुष्परिणामांचा माहितीच्या अभावी जडते आणि काही काळानंतर अमली पदार्थांचे सेवन मजबुरी बनून जाते. नागपूर पोलिसांनी सुरु केलेल्या “पोलीस काका” योजनेतील अधिकारी व कर्मचारी त्यांच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयात जाऊन अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देणार आहे.

नागपूर पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी पथक सतत अमली पदार्थांच्या तस्करी विरोधात कारवाया करते. मात्र तरीही एक आरोपी तुरुंगात जाताच दुसरा आरोपी त्याच्या जागी अमली पदार्थांच्या व्यवसायात उतरतो. कारण तरुणाईमधून अमली पदार्थांची मागणी जास्त आहे. नागपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे वर्ष २०२२ च्या जानेवारी ते जुलै या सात महिन्यातच अमली पदार्थांच्या साठवण, सेवन आणि विक्रीचे ११३ प्रकरण दाखल झाले आहे.

त्यामध्ये नागपूर पोलिसांनी १ कोटी १५ लाख रुपयांचे ३९५ किलो अमली पदार्थ जप्त केले आहे. त्यामध्ये गांजा, ब्राऊन शुगर, चरस, कोकेन, एमडी अशा विविध अमली पदार्थांचा समावेश आहे. या सर्व कारवायांमध्ये १७२ आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे. मात्र तरीही अमली पदार्थांची तस्करी काही केल्या थांबत नाही आहे.

“पोलीस काका” या पथकासाठी निवडलेल्या निवडक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. नावाजलेले व्यसनमुक्ती सल्लागार बॉस्को डिसुझा यांनी नागपूर शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन मधून निवडलेल्या १३५ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. भविष्यात वेळोवेळी मानसोपचार तज्ञ आणि वैद्यकीय तज्ञ ही पोलीस काका पथकाला प्रशिक्षण देणार आहे. पोलीस काकांच्या प्रशिक्षणात पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सहपोलीस आयुक्त अस्वती दोर्जे हे स्वतः उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -