नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटचे ‘प्रोफाइल’ फोटो बदलून डीपीवर तिरंगा लावला आहे. आकाशवाणीच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ च्या ९१ व्या आवृत्तीत देशवासियांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा उल्लेख केला होता आणि लोकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटचा ‘प्रोफाइल’ फोटो बदलण्यास सांगितले होते. २ ते १५ ऑगस्ट दरम्यान तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते. त्याच वेळी, आज (२ ऑगस्ट) रोजी, पंतप्रधानांनी तिरंगा त्यांचे ‘प्रोफाइल’ फोटो म्हणून ठेवले आहे.
यावेळी पंतप्रधानांनी एक ट्विट देखील केले आणि लिहिले की, “आज २ ऑगस्टचा दिवस खास आहे! अशा वेळी जेव्हा आपण आपला देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. आपला देश #HarGharTiranga साठी तयार आहे. देशाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी ही एक सामूहिक चळवळ आहे. मी माझ्या सोशल मीडिया पेजेसवर डीपी बदलला आहे आणि तुम्हा सर्वांनीही असे फोटो ठेवा असं मी आवाहन करतो.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिरंग्याचा ‘प्रोफाइल’ पिक्चर म्हणून वापर करण्याचे आवाहन केले होते. यासोबतच त्यांनी लोकांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचेही आवाहन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आझादी’ अमृत महोत्सव एक जनआंदोलन बनला आहे आणि लोकांनी २ ते १५ ऑगस्ट दरम्यान त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘प्रोफाइल’ पिक्चर म्हणून तिरंगा लावण्याचे आवाहन केल्यानंतर शहा यांचे हे आवाहन आले आहे.
केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत या महिन्यात तीन दिवस देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा फडकवला जाणार आहे. कार्यक्रमांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत लोकसहभागातून घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार असून सरकारी आणि खाजगी आस्थापनेही यात सहभागी होणार आहेत.