मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात साथीचे आजार वाढत असतात आणि पालिका त्यासाठी अनेक उपाययोजना करत असते. मात्र तरीही सध्या डेंग्यू, मलेरिआ आणि विशेष म्हणजे जुलै महिन्यात स्वाइन फ्लू चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहे. मुंबईत सध्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. जुलै महिन्यातील पावसाळा आणि त्यामुळे पसरलेल्या साथीच्या आजारांमुळे सध्या मुंबईत स्वाइन फ्लूची संख्या वाढलेली दिसत आहे.
जुलैच्या संपुर्ण महिन्यात मुंबईत १०५ स्वाइन फ्लू रुग्णांची नोंद झाली आहे. जून मध्ये केवळ दोनच स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले होते. तर गेल्यावर्षी म्हणजे २०२१ च्या जुलै महिन्यात केवळ २१ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले होते. त्यामुळे जुलै महिन्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. दरम्यान, स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यासाठी पालिकेने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. शिंकताना नाकावर आणि तोंडावर हात ठेवणे, डोळ्यांना हात लावू नये, हात स्वच धुवावे, गर्दीत जाणे टाळावे आणि ताप व इतर लक्षणे दिसल्यास स्वत: उपचार न घेता पालिकेच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे, तसेच श्वास घेण्यास अडथळा येत असल्यास, त्वचेचा आणि ओठांचा रंग निळा पडत असल्यास तत्काळ रुग्णालयात दाखल होण्याचे आवाहन पालिकेने मुंबईकरांना केले आहे.
तर मुंबईत स्वाइन फ्लूच्या पाठोपाठ मलेरिया देखील वाढत असून जुलै महिन्यात मलेरियाचे ५६३ रुग्ण आढळले आहेत. तर हेच रुग्ण जून महिन्यात ३५० होते. तर गॅस्ट्रोचे रुग्णही जुलै महिन्यात वाढले असून ६७९ इतके आहेत. त्याचबरोबर जुलै महिन्यात डेंग्यू आणि लेप्टोचे रुग्णही जून महिन्यापेक्षा जास्त आढळले आहेत. लेप्टोचे रुग्ण ६५ तर डेंगूचे ६१ रुग्ण आढळले आहेत. हेपेटायटीसचे रुग्णही जुलै महिन्यात ६५ आढळले आहेत. दरम्यान, गॅस्ट्रो, हेपेटायटीस पासून बचाव करण्यासाठी रस्त्यांवरील उघडे पदार्थ खाऊ नये, असे आवाहन पालिकेने केले. तर मलेरिया आणि डेंग्यूची उत्पत्ती स्थाने नष्ट करावी अथवा डेंग्यू, मलेरियाच्या अळ्या होऊ नये यासाठी घरांवरील प्लास्टिक मधील पाणी काढावे, पिंप आठवड्यातून एकदा स्वच्छे करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
आजार जून जुलै
मलेरिया ३५० ५६३
स्वाइन फ्लू २ १०५
डेंगू ६१ ६५
गॅस्ट्रो ५४३ ६७९
हेपेटायटीस ६४ ६५