बर्मिंगहम : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धा २०२२ मध्ये भारताच्या महिलांच्या (चार) संघाने लॉन बॉल्स स्पर्धेत इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्य़ा संघाला १७-१० च्या फरकाने मात देत सुवर्णपदक जिंकले आहे.
लॉन बॉल्समध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय संघ ठरला आहे. भारतीय संघात लव्हली चौबे, पिंकी, नयनमोनी सौकिया आणि रूपा राणी तिर्की यांचा समावेश आहे. रूपा राणी तिर्की ही संघाची कर्णधार आहे.
सामन्यात सुरुवातीला दोन्ही संघानी चुरशीची कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेने काही काळ आघाडी घेतली होती. पण १० गुण आफ्रिकेचे असताना भारतानेही बरोबरी केली. १०-१० असा स्कोर झाल्यानंतर भारतीय महिलांनी आक्रमक खेळ दाखवत १७ गुणांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला एकही गुण मिळवता आला नाही आणि भारताने १७-१० च्या फरकाने सामना जिंकला.