मुंबई (प्रतिनिधी) : मोठ्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा राज्यात सक्रिय झाला आहे. श्रावण महिना सुरू होताच श्रावण सरी कोसळू लागल्या आहेत. मुंबईच्या हवामान विभागाने आता राज्यातील सहा जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगडमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. तर यासोबतच जोरदार वारेही काही ठिकाणी वाहतील. मुंबईच्या हवामान विभागाकडून हा इशारा दिला गेला आहे.
हवामान खात्याच्या पुणे येथील विभागाचे प्रमुख के. एस. होसळीकर यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. मुंबई हवामान विभागाने पावसाच्या अंदाजाबाबत त्यांनी ट्विटमधून माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा इशारा मुंबई हवामान विभागाने दिला आहे. यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
नाशिक, सोलापूरसह उस्मानाबाद, ठाणे, पालघर आणि रायगड या सहा जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पाऊस पडू शकतो. वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. यासोबतच वेगवान वारेही वाहतील. जवळपास ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात, असे हवामान विभागाने म्हटले आहे. पालघर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील उत्तर भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पुण्यावर पावसाचे ढग जमा होत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.