पूर्वीच्या काळी निरोगी शरीराला अधिकाधिक महत्त्व दिले जात होते. व्यायाम बंधनकारक होता. अर्थात त्याकाळी असलेली शुद्ध हवा, प्रदूषणाचा अभाव, खाण्यामध्ये पौष्टिकतेचा समावेश आदी बाबींचाही प्रभाव होता; परंतु कालपरत्वे वाढत चाललेली लोकसंख्या, वनसंपदेचे घटते प्रमाण, प्रदूषणाचा वाढलेला भस्मासूर, बागायतीच्या माऱ्यामुळे भिजाट झालेल्या शेतजमिनी यामुळे मनुष्याला आता जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. जगण्यासाठी संघर्ष, राहणीमानामध्ये निर्माण झालेली स्पर्धा, खोट्या प्रतिष्ठेपायी भौगोलिक सुखांचा विळखा यामुळे गरजेहून अधिक पैसा निर्माण करण्याची स्पर्धा निर्माण झाली व त्यातून मनुष्य अधिकाधिक पैसा कमविण्याला प्राधान्य देत गेला आणि शरीर संवर्धनाकडे नकळत कानाडोळा होत गेला. पूर्वीही आजार होते. वैद्यकीय सुविधांचे जाळे नव्हते. आयुर्वेदिक औषधांचा आधार होता; परंतु मृत्यूचे प्रमाण मात्र नगण्य होते. कोठेतरी प्लेग अथवा अन्य मोठी साथ आल्यावर बळींची संख्या वाढायची; परंतु या घटना दीड-दोन शतकांमध्ये क्वचित आणि नगण्य प्रमाणात होत असायच्या. पण आता परिस्थितीत बदल झाला आहे. डॉक्टरांना, रुग्णांनाच नाही, तर त्यांच्या नातलगांना, घराघरामध्ये प्रत्येकाला आजारांची नावे तोंडपाठ होऊ लागली आहेत. गेल्या चार वर्षांपासून साथीच्या आजारांच्या जोडीला आता नवनवीन आजार येऊ लागले आहेत. या आजारांनी घराच्याच, राज्याच्या, देशाच्याच नाही, तर जागतिक अर्थकारणावर, प्रगतीवर आपला ठसा उमटवला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कंपन्या-कारखान्यांना टाळे लावून नोकरदारांना घरी बसून काम करण्याची वेळ आली आहे. ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, सर्दी, उलटी, जुलाब या आजारांची नावे परिचित होती. अपघात झाल्यावर अपंगत्व आल्यास अथवा शरीरातील अवयव निकामी झाल्यास त्या आजारांमुळे आपल्या ज्ञानात भर पडत असे. पॅरालेसिस, मोतीबिंदू या आजाराचे रुग्ण आढळून येत असत. पण आता परिस्थिती बदलली आहे. आजारांची नावे बदलली आहेत. त्यांची दहशतही जनसामान्यांमध्ये वाढली आहे. या आजारांमुळे केवळ लागण झालेले रुग्णच नाही, तर रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरच दगावू लागल्याने जगभरात एक वेगळेच भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना नावाचा आजार येईल आणि जगाच्या कानाकोपऱ्यात होत्याचे नव्हते करून जाईल, असे भाकीत याअगोदर कोणी वर्तविले असते, तर सर्वांनीच भाकीत वर्तविणाऱ्याची गणना मुर्खात केली असती. जानेवारी २०२०च्या मध्यावर कोरोनाचे आपल्या देशात आगमन झाले. तो आला, त्याने पाहिले आणि त्याने संपविले याच शब्दांमध्ये कोरोना महामारीच्या वाटचालीचे वर्णन करावे लागेल. कोरोनामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. काही पिढ्या कोरोनाने उद्ध्वस्त झाल्या आहेत, इतके भयावह उपद्रवमूल्य कोरोनाने आपल्या अस्तित्वामुळे निर्माण केले आहे.
१८ एप्रिल १८५३ मध्ये या देशात सर्वप्रथम रेल्वे सुरू झाली. त्यानंतर रेल्वेने कधी मागे वळून पाहिले नाही. देशाच्या कानाकोपऱ्यांत रेल्वे रुळांचे जाळे विखुरले गेले. त्यावरून रेल्वे अखंडितपणे धावत होती. पण या प्रवासी रेल्वे सेवेलाही काही काळ ब्रेक लावण्याचे काम कोरोनाने केले. देशाच्या तसेच जगाच्या कानाकोपऱ्यातील अर्थकारणाला, प्रगतीला, उलाढालीला ब्रेक लावण्याचे काम कोरोनाने केले. त्यामुळे निर्माण झालेल्या पडझडीतून जग अजून सावरलेले नाही. घरामध्ये मुलांना शिक्षणासाठीच, तर पालकांना कामासाठीही ऑनलाइनचा आधार घ्यावा लागला होता. कोरोनामुळे ‘कुटुंब थांबलंय घरात’ हे दृश्य सर्वत्रच पाहावयास मिळाले. आपल्या देशाने अन्य देशांच्या तुलनेत मोठा संघर्ष करून कोरोनाला थोपविण्यात यश मिळाले आहे. लसीकरणाच्या कार्यक्रमाला गांभीर्याने घेण्यात आले. प्रशासनाच्या प्रयत्नाला देशवासीयांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या काळात भारतीयांनी खऱ्या अर्थाने एकमेकांना सांभाळण्याचे, आधार देण्याचे काम केले. समाजसेवक रस्त्यारस्त्यावर उतरून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हातभार देत होते. भुकेलेल्यांना अन्न देत होते. कोरोनाग्रस्तांना उपचार मिळवून देण्यासाठी रुग्णालयात धावपळ करत होते. मृत्यू झालेल्यांचा अंत्यविधी करण्यासाठी स्मशानातही सोबत होते. कोरोनामध्ये माणुसकी पावलापावलावर पाहावयास मिळाली.
कोरोनानंतर भारतात म्युकर मायकोसिसचे सावट निर्माण झाले. म्युकर मायकोसिसमुळे डोळ्यांमध्ये बुरशी येते, डोळे गमविण्याची वेळ येते, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात येत होती. पण सोशल मीडियावर कार्यरत असणाऱ्या समाजसेवकांनी म्युकर मायकोसिसचा उद्रेक होण्यापूर्वीच म्युकर मायकोसिसची भीती निर्माण केली. कोरोनाच्या तुलनेत म्युकर मायकोसिसची उपचारपद्धती महागडी होती. आता जनजीवन कुठे सुरळीत होण्यास सुरुवात झालेली असतानाच मंकीपॉक्स आजाराने सर्वसामान्यांची झोप उडविली आहे. मंकीपॉक्सने जगातील ६०हून अधिक देशांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. आपल्या अशियाई देशांच्या तुलनेत युरोपिय देशांमध्ये मंकीपॉक्सचा सध्या उपद्रव अधिक आहे. जागतिक आरोग्य विभागाने मंकीपॉक्सचे सर्व धोके लक्षात घेऊन डब्ल्यूएचओने मंकीपॉक्सला ‘जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ म्हणून घोषित केले आहे. त्यावरून मंकीपॉक्सचे गांभीर्य सर्वांच्याच निदर्शनास आले आहे. आपली काळजी आपणच घेतल्यास आजारांना खतपाणी मिळणार नाही. माणूस गमावल्यावर समाजाची होणारी हानी संशोधनाचा विषय असला तरी त्या त्या कुटुंबाला मात्र अपंगत्व प्राप्त होत असते. त्यामुळे ‘आरोग्यम् धनसंपदा’ याचे महत्त्व मनावर बिंबविणे आवश्यक आहे. व्यायामावर भर देण्याची पुन्हा वेळ आली आहे. कोरोनाशी लढाई आपण लढतच आहोत. सध्या पाऊस सुरू असल्याने ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू आदी साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. खासगी तसेच सार्वजनिक रुग्णालयातील व दवाखान्यातील गर्दी आपणास साथीच्या आजारांचे अस्तित्व दाखवून देत आहे. आजार न होण्यासाठी काळजी घेणे हा कमीपणा नाही, तर सध्याची गरज आहे. काळजी न घेतल्याने कोरोनाची आकडेवारी वाढू लागली आहे. मंकीपॉक्सचे रुग्ण दिसू लागले आहेत. मंकीपॉक्स आज आपल्या देशात नगण्य असला तरी उंबरठ्यावर आहे. गाफीलपणा चालणार नाही. कोरोनाच्या बाबतीत जे झाले ते मंकीपॉक्सच्या बाबतीत घडू नये, यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.