Tuesday, March 25, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यदीनदयाळ सेवा प्रतिष्ठान, यवतमाळ

दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान, यवतमाळ

शिबानी जोशी

यवतमाळ जिल्ह्यात जवळजवळ ५६ पाडे पारधी समाजाचे आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ४०-५० वर्षे उलटली तरी या ठिकाणी सर्व सुविधा, व्यवस्था पोहोचल्या नव्हत्या. पारधी समाजात शिक्षणाचा पूर्ण अभाव होता. अंधश्रद्धा अस्वच्छता व्यसनाधीनता यात हा समाज अडकलेला होता. हे लक्षात आल्यावर १९९७ सालच्या सुमारास यवतमाळमधल्या संघाच्या कार्यकर्त्यांना पारधी समाजासाठी काहीतरी करावं असं वाटू लागलं. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म मानव दर्शन आणि अंत्योदय या संकल्पना मांडल्या होत्या. समाजातील शेवटच्या घटकाचा जेव्हा विकास होईल, तेव्हाच तो खरा विकास. मूठभर लोकांचा विकास म्हणजे देशाचा विकास नाही, असं त्यांचं मत होत. हा दीनदयाळ उपाध्याय यांचा मूलमंत्र लक्षात घेऊन त्यांच्याच नावानं संघ कार्यकर्त्यांनी यवतमाळमध्ये १९९७ साली ही सेवाभावी संस्था सुरू केली.

संस्थेने जेव्हा यवतमाळ जिल्ह्यात काम सुरू केलं, तेव्हा पारधी समाजात दोन ते पाच टक्के इतकेच शिक्षणाचे प्रमाण होत. अनारोग्य, दारिद्र्य, अस्वच्छता, अशिक्षितपणा या समाजात दिसून येत असे. १९९५ साली शासनाने दादा इदाते यांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठित केली आणि पारधी समाजावरचा डाग पुसला गेला. सुरुवातीला एका भाड्याच्या खोलीमध्ये केवळ पाच पारधी विद्यार्थ्यांना घेऊन पहिले वसतिगृह सुरू केले. विवेकानंद छात्रावास अशा नावाने हे पहिले काम संस्थेचे सुरू झाले. हे काम पाहून वडगाव ग्रामपंचायतने एक जागा दिली. आतापर्यंत गेल्या २५ वर्षांत जवळपास साडेपाचशे मुलं इथे राहून, शिकून गेली आहेत. सुरुवातीला मुलं अक्षरशः बोलावून आणावी लागली. काही मुलं पळून जायची, काही टिकायची. पण आता संस्थेचे काम पाहून आपणहून पालक मुलं इथे ठेवण्यासाठी येतात. २०१८ला त्या ठिकाणी इमारत बांधून शंभर विद्यार्थी राहतील, असं वसतिगृह उभ राहिलं. ही मुलं जवळपासच्या शाळेत शिकायला जातात. मात्र त्यांचं राहणं, खाणं, पिणं, पुस्तक हा सर्व खर्च संस्था करते. या समाजाला केवळ शिक्षण देऊन चालणार नाही, तर रोजगाराच्या संधी, स्वच्छतेची माहिती, संस्कार या गोष्टीही देण्याची गरज आहे. असं लक्षात आल्यानंतर संस्थेने आरोग्य सुविधा देण्याचं ठरवलं. प्रत्येक पाड्यात आठवड्याला दोन दिवस डॉक्टर जाऊन वैद्यकीय सुविधा देतात. त्याशिवाय गावातीलच तरुणाला प्रशिक्षण देऊन आरोग्य रक्षक म्हणून नेमलं गेलं. प्राथमिक उपचार हा युवक, पाड्यातील लोकांना देऊ शकतो. त्यांच्यासाठी आरोग्य शिबीर आयोजित केली जातात.

आता इथल्या मुलांना शिक्षण दिल्यानंतर ते उपजीविकेसाठी काय करणार? पारधी समाजाचा त्यापूर्वीचा व्यवसाय हा शिकार करणे हा होता. त्यामुळे या तरुणांसाठी स्वयंरोजगार कार्यक्रम सुरू करण्यात आला. जो व्यवसाय त्यांच्या गावात चालू शकेल म्हणजे किराणा मालाचे, भाजीचे दुकान, शेळीपालन, स्टेशनरी दुकान टाकून देण्यासाठी त्याला प्रशिक्षण तसेच इतरही आर्थिक मदत दिली जाते. मुलांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न झाला; परंतु त्यांचे पालक जर सक्षम असतील, तर अशा पद्धतीने मुलं शिक्षणापासून वंचित राहणारच नाहीत, हे लक्षात घेऊन कृषी विकासावर संस्थेने लक्ष द्यायला सुरुवात केली. आज हा प्रकल्प म्हणजे संस्थेचे वैशिष्ट्य ठरलं आहे. याला कारण असं झालं की, २००१ पासून यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्या होत्या. देशभरात जर साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असतील, तर त्यात सर्वात जास्त आत्महत्या यवतमाळला झाल्यात. त्यामुळे यावर संघ कार्यकर्त्यांनी जवळपास एक वर्ष विचारविनिमय केला आणि पहिला कार्यक्रम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या उत्थानाचं काम हाती घेतलं. त्यांचा अभ्यास करताना तीन समस्या जाणवल्या. आर्थिक आधार, मानसिक आधार व शैक्षणिक, मुलींचं शिक्षण. त्यासाठी ४०० कुटुंबांची निवड केली आणि त्यांचे पुनर्वसन सुरू केलं. काही कुटुंबात वीस, बावीस वर्षांच्या मुली विधवा झाल्या होत्या. काहींना तीन लहान मुलं आणि एक पोटात आहे अशी अवस्था होती. अशा महिलांना प्रशिक्षण देणं, त्यांना एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणे, मूळ म्हणजे त्यांना मानसिक आधार देणे असं काम सुरू केलं. एकूण १८ प्रकारचे व्यवसाय संस्थेने निवडले आहेत. आता तीनशे कुटुंब उत्तम प्रकारे व्यवसाय चालवत आहेत. शिवाय इतरांनाही ते आधार देत आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करायला सुरुवात केली. खरं तर शासकीय वसतिगृह असतात; परंतु त्यांच्या मर्यादा असतात आणि इथे अॅडमिशन मिळणं तुलनेनं सोपं असतं. पोशिंदा गेल्यानंतर तीन-चार महिने त्या शेतकऱ्यांच्या घरी कोणी आलंही नव्हतं. संस्थेचा कार्यकर्ता नुसता त्यांच्या घरी गेला तरी त्यांना समाधान मिळतं. दर वर्षी भाऊबीज कार्यक्रम घेऊन या महिलांना ओवाळायला दिलं जातं. त्यातील काही महिला तर अशा वेळी रडतात. कारण वैधव्यामुळे त्यांना भावाला ओवाळणी करण्याला मिळत नव्हती, ती त्या कार्यक्रमामुळे मिळू लागलीये. हे सर्व काम करण्यासाठी कार्यकर्त्यांची खूप मोठी टीम संघटनेकडे आहे. काही कार्यकर्त्यांना मानधन देण्यात येतं, तर काही स्वयंसेवी कार्यकर्ते असतात. त्याशिवाय वैद्यकीय तपासणी शिबीर, औषध उपचार यालाही मदत केली जाते. अगदी त्यांच्या घरातील मुलीच्या लग्नालाही आर्थिक मदत केली जाते.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करतानाच संघ कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की, आत्महत्या होऊच नयेत म्हणून काहीतरी करायला हवं आणि त्यासाठी मग शाश्वत कृषी विकास प्रकल्प हाती घेण्यात आला. केमिकलचा वापर वाढल्यामुळे शेती महागडीही झाली आहे. शिवाय जमिनीचा कस वर्षानुवर्षे कमी होत चालला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन त्यामुळेच केलं आहे. त्यामुळे कोणतेही केमिकल खत न घालता, शेण, गोमूत्र, कडुनिंब, धोत्रा अशी ४२ प्रकारचं पालापाचोळा, नैसर्गिक खत वापरून शेती करण्याचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला एका गावातल्या पाच शेतकऱ्यांना घेऊन हे काम सुरू केलं. यासाठी प्रशिक्षित फिल्ड वर्कर्स गावागावांत जाऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतात. संस्थेचे प्रशिक्षित कार्यकर्ते आता इतरांनाही प्रशिक्षण देऊ लागले आहेत. आता चार गावातले शेतकरी अशा प्रकारे शेती करत आहेत. या शाश्वत शेतीचे उत्तम परिणाम पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला शेतकऱ्याला सांगितलं जात की, तुझ्याकडे दहा एकर जमीन असेल, तर तू दोन एकरावर हा प्रयोग कर. तो यशस्वी झाला, तर तू संपूर्ण शेती त्याप्रमाणे कर आणि तो पहिल्याच वर्षीपासून यशस्वी होत आहे. केमिकल खत दिले की, उत्पन्न वाढतं हा आता गैरसमज उरला आहे. कारण जेव्हा जमिनीचा कस चांगला होता, तेव्हा थोडंसं केमिकल खत टाकूनही भरपूर उत्पन्न येत असे; परंतु वर्षानुवर्षे केमिकल खत टाकल्यामुळे आता जमिनीचा कस सगळीकडेच कमी होत चालला आहे. त्यामुळे शाश्वत शेतीकडे वळण याला पर्याय नाही. संस्थेने अशा प्रकारचं काम सुरू केलेल्या गावांमध्ये आता आत्महत्या होत नाहीत. संस्थेनं दिनदयाळ प्रबोधिनी या नावाने एक मोठं प्रशिक्षण केंद्रही उभारलं आहे. सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते २०१६ साली त्याचे उद्घाटन झालं आहे. २५ एकर जमीन दान मिळाली, तिथे सर्वात प्रथम शेतीविषयक प्रयोग केले जातात. तिथे देशी बिजांच उत्पादनही केलं जातं. महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या या संस्थेला पुरस्कार न मिळतील तरच नवल. संस्थेच काम पाहून राज्य शासनाचा बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनी, दीनदयाळ ट्रस्ट नागपूर, रमाबाई रानडे स्मृती पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. शाश्वत विकासाकडे १ लाख शेतकऱ्यांना वळवण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. कारण जेवढे अधिकाधिक शेतकरी शाश्वत शेतीकडे वळतील, तितकीच ती एक मोठी चळवळ उभी राहू शकेल, असं संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन परसोडकर यांनी सांगितले. अशा तऱ्हेने पारधी व गोरगरीब समाजातल्या आबालवृद्धांचा विचार करून सर्वंकष सामाजिक कार्य चालवणारी ही संस्था म्हणावी लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -